म. टा. प्रतिनिधी, मुंबई अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अंमली पदार्थ संबंधी तपासासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने () उडी घेतल्यापासून चित्रपटसृष्टीशी संबंधित अनेकांशी चौकशी करण्यात आली आहे. याचसंबंधी 'एनसीबी'ने काही सिनेतारकांचे मोबाइल व इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट यांचा न्यायवैद्यक तपास सुरू केला आहे. त्यासाठी ते गांधीनगरच्या न्यायवैद्यक संचालनालयाकडे पाठविण्यात आले आहेत. सुशांतसिंह प्रकरणात अंमली पदार्थांचा संबंध असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, 'एनसीबी'ने सिने कलावंतांसह अंमली पदार्थ दलाल तसेच काही चित्रपट निर्मात्या कंपन्यांशी संलग्न असलेल्यांची चौकशी केली होती. या चौकशीदरम्यान संबंधित संशयितांचे मोबाइल तसेच ते वापरत असलेल्या गॅजेटचीही माहिती घेतली होती. काही मोबाइल जप्त करण्यात आले होते. या सर्व उपकरणांची न्यायवैद्यक तपासणी आता सुरू करण्यात आली आहे. 'एनसीबी'मधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आतापर्यंत ३० मोबाइल फोन व ८५ गॅजेट न्यायवैद्यक संचालनालयाकडे पाठविण्यात आले आहेत. त्याखेरीज विविध प्रकारच्या अंमली पदार्थांचे २५ नमुनेही तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स गॅजेटध्ये मोबाइल फोनखेरीज लॅपटॉप, टॅब, पेन ड्राइव्ह यांचा समावेश आहे. तसेच, रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, अभिनेत्री सारा अली खान, श्रद्धा कपूर, दीपिका पदुकोण, अभिनेता अर्जुन रामपाल यांचे मोबाइल फोनदेखील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.' 'एनसीबी'ने या प्रकरणात आतापर्यंत ५० हून अधिक संशयितांची चौकशी केली आहे. त्यातील २५ जणांना अटक केली आहे. तसेच, अडीच कोटी रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा आतापर्यंत जप्त करण्यात आला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2Wq7XSB
No comments:
Post a Comment