Breaking

Tuesday, April 13, 2021

रेमडेसिवीर खरेदीत 'तोट्या'चा डोस https://ift.tt/3a94104

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोना संकटाने प्राण कंठाशी आले असतानाही त्यावरील उपचारांमध्ये महत्त्वाचा भाग असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा लक्षात घेऊन त्यावर मलिदा कमाविण्याचा गोरखधंदा उघडकीस आला आहे. राज्य सरकार संस्थेच्या माध्यमातून ६६५ रुपयांना खरेदी करीत असलेले इंजेक्शन मात्र तब्बल १५६८ रुपयांना खरेदी करणार आहे. या खरेदीत पालिका तब्बल १८ कोटी रुपये जादा मोजणार आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा राज्यात सगळीकडे तुटवडा आहे. हे इंजेक्शन हे करोनावरील अंतिम उपाय नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले असले तरीही ते दिल्याने रुग्णांच्या स्थितीत फरक पडत असल्याचे मानले जाते. त्यामुळे राज्यात सगळीकडे ते वापरले जात आहे. देशामध्ये पाच ते सहा कंपन्या हे औषध तयार करतात. त्यांच्याकडून निविदा पद्धतीने राज्य सरकार व महापालिका खरेदी करतात. त्याची मागणी वाढल्यानंतर सरकार व पालिका या दोघांनी त्याच्या निविदा काढल्या होत्या. राज्य सरकारची खरेदी हाफकिन संस्थेच्या माध्यमातून केली जात आहे. नऊ एप्रिलला हाफकिन संस्थेने 'कॅडिलिया' या औषध कंपनीला ५७ हजार १०० इंजेक्शनची ऑर्डर दिली असून ही खरेदी प्रत्येकी ६६५ रुपयांना करण्यात येणार आहे. सुमारे तीन कोटी ८० लाख रुपये त्यासाठी दिले जाणार आहेत. मुंबई महापालिकेने मात्र 'मायलन' या संस्थेकडून ही इंजेक्शन घेण्याचे ठरविले असून सात एप्रिलला त्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहे. महापालिकेच्या मध्यवर्ती खरेदी प्राधिकरणाकडून ही खरेदी होत असून महापालिका आयुक्त व अतिरिक्त पालिका आयुक्त यांच्या परवानगीने दोन लाख इंजेक्शन प्रत्येकी १५६८ रुपयांना घेण्यात येणार असल्याचे या आदेशांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित कंपनीला ३१ कोटी ३६ लाख रुपये अदा करावे लागणार आहेत. मुळात राज्य सरकारने आदेश काढून नागरिकांना किरकोळ विक्रेत्यांनी हे इंजेक्शन जास्तीत जास्त १५०० रुपयांना विकले पाहिजे, असे बंधन घातले आहे. अर्थातच त्यामध्ये विक्रेता, डिलर यांचे कमिशन गृहित धरले आहे. असे असताना मुंबई महापालिका थेट कंपनीकडून खरेदी करत असतानाही १५०० रुपयांपेक्षा जास्त पैसे का देत आहे, असा सवाल केला जात आहे. मुंबई महापालिकेने हाफकिन संस्थेने खरेदी केलेल्या दराने खरेदी केली असती तर ही खरेदी १३ कोटी ३० लाख रुपयांमध्ये होणे शक्य होते. त्यासाठी पालिका आता तब्बल १८ कोटी रुपये जास्त मोजणार आहे. हाफकिनचा दर जुना, पालिकेला नव्या दराने पुरवठा याविषयी अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विषय ऐकून घेऊन फोन बंद केला. तर पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी प्राधिकरणाचे प्रमुख रमाकांत बिरादार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी 'जेव्हा हाफकिनचा रेमडेसिवीरचा दर ६६८ रुपये होता, तेव्हा पालिकेचा ६५० रुपये होता. आता हाफकिनने दिलेली इंजेक्शन ही जुन्या स्टॉकमधील आहेत. त्यामुळे तो दर ६६८ रुपये आहे. दोन दिवसांनी हाफकिनची नवीन इंजेक्शन येतील तेव्हा दर जादा असणार आहे,' असे सांगितले. सध्या भारतात फक्त मायलान कंपनीकडेच रेमडेसिवीरचा उपलब्ध होते. औरंगाबाद, अहमदाबाद, सुरत महापालिकांनाही १५६८ रुपये दराने ही इंजेक्शन खरेदी केली आहेत. त्यांच्या खरेदीच्या प्रती पालिकेकडे आहेत, असा दावा बिरादार यांनी केला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3saKeU4

No comments:

Post a Comment