कोल्हापूर: महानगरपालिकेच्या घरफाळा वसुली विभागात संगणकात चुकीच्या नोंदी व करार पत्रांची बेकायदेशीर अंमलबजावणी करून या विभागातील कर्मचाऱ्यांनी तीन कोटी १४ लाख ६१ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी चार कर्मचाऱ्यांविरुद्ध शनिवारी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तत्कालीन नगर सचिव दिवाकर बापुसो कारंडे (वय ५२, रा . तिवले गल्ली) , नितीन राजाराम नंदवाळकर (४८, रा. ब्रम्हपुरी), अनिरुध्द प्रमोद शेटे (३५, रा. शिवांजली अपार्टमेंट, घाटगे कॉलनी लिशा हॉटेल समोर) आणि विजय तुकाराम खातू (५२, रा. सासणे नगर, जरगनगर रोड ) अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे आहेत. मोठ्या रकमेच्या अपहारात तत्कालीन नगर सचिवाचे नाव आल्याने शहरात खळबळ माजली आहे. लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा नोंद झालेले चारही संशयित हे मनपाच्या प्रधान कार्यालयात घरफाळा विभागामध्ये कार्यरत होते. त्यातील दिवाकर कारंडे हे कर निर्धारक व संग्राहक, नितीन नंदवाळकर व अनिरुद्ध शेटे हे दोघे अधीक्षक , तर विजय खातू हा लिपिक पदावर कार्यरत होता. या चौघांनी १ एप्रिल २०१४ ते १२ फेब्रुवारी २०२० पर्यंत घरफाळा संगणकीय विभागामध्ये चुकीच्या नोंदी, करारपत्राची चुकीची अंमलबजावणी करुन पालिकेचे आर्थिक नुकसान करत तब्बल तीन कोटी १४ लाख ६१ हजार ३८ रुपयांचा अपहार केला आहे. संशयितांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करुन पालिका विभागाकडील कूळ वापरातील मिळकत धारकांना भाडे करारानुसार आकारणी न करता कमी भाडेवर आकारणी करणे, कर आकारणी बेकायदेशीरपणे कमी करणे, निश्चित आकारणी झालेल्या वसुलीत मोठ्या रक्कमेची सुट देणे व आपल्या अधिकार मर्यादेचे उल्लंघन करुन बड्या मिळकत धारकांना सवलत देऊन संगनमताने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अधिकाराचा जाणीवपूर्वक गैरवापर केला आहे. पोलिस तपासात या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक होईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक अनिल गुजर यांनी दिली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3hs8U6g
No comments:
Post a Comment