पंढरपूरः दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत अगदी उत्साहात साजरा केला जाणारा आषाढी एकादशीचा सोहळा यंदा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. आषाढी एकादशीची महापूजा यांनी सपत्नीक केली. यंदा मानाचे वारकरी म्हणून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहारा देणाऱ्या पाथर्डी येथील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बडे यांना मान मिळाला. आषाढी एकादशीपासून करोनाचे संकट नष्ट होऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी घातले. यावेळी मंत्री आदित्य ठाकरे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. विठुमाऊलीसमोर इथे कुणी मुख्यमंत्री नाही, कुणी अधिकारी नाही, सर्वजण एकसारखे आहेत. विठ्ठल पूजेचा मान मला कधी मिळेल आणि अशा परिस्थितीत महापूजा होईल, याचा कधीही विचार केला नव्हता. केवळ महाराष्ट्राच्या नव्हे, तर विश्वाच्यावतीने माऊलीचरणी साकडे घातले आहे. लवकरात लवकर नव्हे, तर आषाढी एकादशीपासून करोनाचे संकट नष्ट होवो. जगाला पुन्हा एकदा आनंदी, मोकळे आणि निरोगी जीवन जगण्याचे भाग्य प्राप्त होवो, अशी प्रार्थना उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. दरम्यान, आषाढी यात्रेच्या इतिहासात यंदा प्रथमच करोनामुळे आषाढ शुद्ध दशमीला पंढरपूर नगरी वारकऱ्यांविना ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. आषाढी यात्रा म्हटले की, ज्या मंदिर परिसरात यात्रेच्या आदल्या दिवसापासून मुंगी शिरायलाही जागा नसायची त्या संपूर्ण परिसरात मंगळवारी शुकशुकाट पसरला होता.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3g88T62
No comments:
Post a Comment