Breaking

Thursday, August 20, 2020

'शिवरायांच्या महाराष्ट्राला नेहमीच हा दुजाभाव सहन करावा लागला' https://ift.tt/2QaIKse

मुंबई: 'प्रत्येक राज्याने भूमिपुत्रांचा विचार करावा. त्यांना रोजगारात प्राधान्य मिळावे हे घटनेनुसारच आहे, पण त्या घटनेनुसार महाराष्ट्राने भूमिपुत्रांचा विचार केल्यावर देशाला राष्ट्रीय एकात्मतेची उचकी लागते. मध्य प्रदेशने त्याच राष्ट्रीय एकात्मतेवर हातोडा मारला असताना सगळे चिडीचूप कसे आहेत? हा दुजाभाव शिवरायांच्या महाराष्ट्राला नेहमीच सहन करावा लागला,' अशी खंत शिवसेनेनं व्यक्त केली आहे. मध्य प्रदेशातील भाजप सरकारनं स्थानिकांना नोकऱ्या देण्याचा कायदा केला आहे. त्यानिमित्तानं शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून राष्ट्रीय एकात्मतावाल्यांवर टीका करण्यात आली आहे. महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देण्याचा विचार समोर आला, त्या प्रत्येक वेळी एकात्मतेचे सर्वपक्षीय ठेकेदार हे संसदेपासून राज्याराज्यांतील विधानसभेत महाराष्ट्राच्या नावाने ठणाणा करीत उभे राहिले. भूमिपुत्रांनाच रोजगारात प्राधान्य ही चळवळ शिवसेनेने सुरू केली. ५० वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या विचारांची ठिणगी टाकली तेव्हा देशात काय गहजब उडाला होता! पण मध्य प्रदेश सरकारच्या निर्णयामुळं अजून राष्ट्रीय एकात्मतावाल्यांचे मन डचमळून कसे आले नाही,' असा प्रश्न शिवसेनेनं केला आहे. हे धोरण शिवराजसिंह चौहान सरकार शत-प्रतिशत राबविणार आहे. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे ८० टक्के नोकऱ्या भूमिपुत्रांना आणि २० टक्क्यांमध्ये इतर सर्व, तशी वाटणी करायलाही शिवराज सरकार तयार नाही. अशाच प्रकारे खासगी नोकऱ्यांमध्ये ७५ टक्के आरक्षण स्थानिक युवकांना देण्याचा कायदा गेल्या वर्षी आंध्र प्रदेश सरकारनेही केलाच आहे. त्या वेळीही कोणाला राष्ट्रीय एकात्मतेची चिंता वाटली नाही. प्रत्येक राज्य हे आपापल्या लोकांची काळजी घेतच असते, पण महाराष्ट्राने ती काळजी घेतली की, देशभरातील सगळ्यांचीच नरडी गरम होतात,' असा संताप शिवसेनेनं व्यक्त केला आहे. 'करोना काळात मुंबई-महाराष्ट्राने लाखो परप्रांतीय मजुरांना दोन वेळच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली, त्यांना आपापल्या राज्यात परत पाठविण्याचा बंदोबस्त केला, पण एखादे ओडिशाचे नवीन पटनाईक, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांनी कृतज्ञतेचे दोन शब्द व्यक्त केले तसे इतर राज्यांनी केले काय? इतके करूनही त्या त्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या बाबतीत फक्त फुत्कारच सोडले, असा आरोपही अग्रलेखातून करण्यात आला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/34qMk9Y

No comments:

Post a Comment