नवी दिल्ली: करोनाच्या साथीनं देशात थैमान घातलं असताना पंतप्रधान यांनी आज देशवासीयांना एक दिलासा देणारी बातमी दिली आहे. 'भारतात करोनावरील एक, दोन नाही तर तीन लसींची चाचणी सुरू आहे. लवकरच निर्मितीची प्रक्रियाही सुरू होईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. () देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं पंतप्रधान मोदी यांनी आज ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून भाषण केलं. अपेक्षेप्रमाणे मोदी यांनी देशातील करोनाची सद्यस्थिती, आरोग्य व्यवस्थेची स्थिती आणि करोनावर मात करण्यासाठी संशोधक करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. 'देशात करोनाची साथ आली तेव्हा करोनाच्या आजाराची चाचणी करणारी केवळ एक प्रयोगशाळा (Corona Testing Lab) देशात होती. आज १४०० हून अधिक प्रयोगशाळा आहेत. करोनावरील लस बनविण्यासाठी भारतातील संशोधक अथक परिश्रम करत आहेत. देशात सध्या एक, दोन नव्हे तर तीन-तीन लसी चाचणीच्या वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. संशोधकांनी हिरवा झेंडा दाखवताच या लसींची मोठ्या प्रमाणावर निर्मिती केली जाईल. त्याची तयारी देखील झाली आहे. ही लस कमीत कमी वेळेत देशातील शेवटच्या माणसापर्यंत कशी जाईल याचा रोडमॅपही तयार आहे,' असं मोदी म्हणाले. देशात आजपासून 'नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन' सुरू करण्याची घोषणाही मोदी यांनी यावेळी केली. या अंतर्गत देशातील सर्व नागरिकांना डिजिटल 'हेल्थ आयडी' दिला जाणार आहे. यात संबंधित व्यक्तीच्या आरोग्याची सर्व माहिती असेल. एखाद्या व्यक्तीवर किती चाचण्या झाल्या, त्याला कोणते आजार आहेत, कोणत्या डॉक्टरनं त्याला औषध दिलं, केव्हा दिलं. तपासणीचा अहवाल काय आहे, ही सगळी माहिती यात समाविष्ट असेल. हे डिजिटल हेल्थ मिशन देशाच्या आरोग्य क्षेत्रात नवी क्रांती ठरेल,' असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2Y4z86P
No comments:
Post a Comment