मुंबई: बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट उधळण्यात आला आहे. सलमानच्या हत्येसाठी मुंबईत रेकी करणाऱ्याला गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. राहुल ऊर्फ सांगा ऊर्फ बाबा असं या गँगस्टरचं नाव असून तो लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याचं सूत्रांनी सांगितलं. काळवीट शिकारप्रकरणी हा बिश्नोई गँगच्या रडारवर असून या गँगकडून सलमानला या आधीच जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. पंजाब, हरयाणा आणि राजस्थान या राज्यात ही टोळी सक्रिय आहे. राहुल हा कुविख्यात गुंड असून त्याने आतापर्यंत चार हत्या केल्या आहेत. ऑगस्ट २०१९मध्ये झज्जरमध्ये एका व्यक्तिची हत्या केली होती. लॉरेन्स बिश्नोईच्या इशाऱ्यावरून त्याने डिसेंबर २०१९मध्ये मनोट येथे एकाची हत्या केली होती. तसेच २० जून २०२०मध्येही त्याने भिवानी येथे एकाची हत्या केली होती. त्याने फरिदाबादच्या एसजीएम नगरमध्येही २४ जून २०२०मध्ये एकाची हत्या केली होती. दिल्लीच्या गुन्हे अन्वेषण विभागाने त्याला उत्तराखंडमधून अटक केली आहे. त्याची चौकशी सुरू असून मुंबई पोलीसही त्याची चौकशी करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. राहुलने मुंबईत वांद्रे येथे जानेवारीत सलमानची रेकी केली होती. त्यासाठी तो दोन दिवस मुंबईत थांबला होता. यावेळी सलमान किती वाजता घरातून बाहेर पडतो यावर लक्ष ठेवून असायचा. पोलिसांनी १५ ऑगस्ट रोजी त्याला उत्तराखंडच्या पौडी गढवाल येथून अटक केली. त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मंगळवारी त्याची कोठडी संपल्यानंतर त्याला पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याची निमका तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. पोलीस अधिकारी राजेश दुग्गल यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. राहुलने जानेवारी २०२०मध्ये गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि संपत नेहराच्या इशाऱ्यावरून सलमानच्या घराची रेकी केली होती. त्यानंतर त्याने राजस्थानच्या तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईला रेकीची माहिती दिली होती, असं दुग्गल यांनी सांगितलं. रेकी केल्यानंतर राहुल पुन्हा राजस्थानात आला. त्यानंतर लॉकडाऊन सुरू झाल्याने त्याचा संपूर्ण प्लॅन फेल गेला. दरम्यान, राहुलला अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांनी सलमानच्या सुरक्षेत वाढ केल्याचं सूत्रांनी सांगितलं.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2DZ1U26
No comments:
Post a Comment