वृत्तसंस्था, हैदराबाद : 'भारत कमकुवत देश नसून कोणत्याही आक्रमणाला चोख प्रत्युत्तर देऊ शकतो, हे चीन सीमेवरील संघर्षाच्या परिस्थितीच्या हाताळणीतून भारताने दाखवून दिले आहे. भारताला शांततेच्या मार्गाने तोडगा हवा आहे; पण देशाच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचलेली सहन केली जाणार नाही,' असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी शनिवारी ठामपणे सांगितले. येथील एअर फोर्स अॅकॅडमीच्या दीक्षांत संचलनाच्या कार्यक्रमावेळी सिंह बोलत होते. पूर्व लडाखमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर भारत आणि चीन एकमेकांसमोर सात महिने तणावाच्या स्थितीत उभे ठाकले होते. त्या संदर्भाने सिंह यांनी भूमिका स्पष्ट केली. ''च्या संकटादरम्यान चीनचा पवित्रा त्यांचे हेतू दर्शवत होता, असेही ते म्हणाले. 'चीनसोबतचे वाद मिटविण्यासाठी राजकीय आणि लष्कराच्या स्तरावर अनेकदा चर्चा झाल्या. भारताला संघर्ष नको; तर शांतता हवी आहे,' असे राजनाथसिंह म्हणाले. त्यांनी पाकिस्तानचाही समाचार घेतला. 'भारताकडून चार वेळा युद्ध हरल्यानंतरही पाकिस्तानच्या सीमेवरील कुरापती सुरूच आहेत. दहशतवादाच्या रूपाने पाकिस्तानने '' सुरू केले आहे. सशस्त्र दले आणि पोलिस दहशतवादाशी प्रभावीपणे लढा देत आहेत,' असे सिंह म्हणाले. 'दहशतवादाशी केवळ देशातच लढले जात नसून; सीमेपलीकडेही जाऊन संपवले जात आहे. बालाकोटमध्ये केलेल्या एअरस्ट्राइकमुळे जगाला भारताचे सामर्थ्य, भारताचे हेतू आणि दहशतवादाविरुद्धची ठाम भूमिका दिसली,' असेही त्यांनी पुढे सांगितले. 'सायबर क्षेत्रातील आव्हाने' 'देशासमोर केवळ सीमाभागातीलच आव्हाने उभी नसून अवकाश आणि सायबर क्षेत्रातही ती आहेत. त्यासाठी देशाला सुसज्ज राहावे लागणार आहे. त्यामुळे देशाच्या उत्कर्षासाठी तुमच्यामध्ये जवानासोबतच एक अभ्यासू व्यक्तिमत्त्वही जोपासले गेले पाहिजे. लष्कराची धोरणे, नवे तंत्रज्ञान याबाबत नव्या लष्करी अधिकाऱ्यांनी स्वत:ला अद्ययावत ठेवले पाहिजे. त्याचप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्तेवर भर दिला पाहिजे,' असा सल्ला राजनाथसिंह यांनी उपस्थितांना दिला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2Kdoc3j
No comments:
Post a Comment