पंकज मोहरीर, चंद्रपूर व्याघ्रसंवर्धसाठी आटोकाट प्रयत्न होत असतानाच मागील वर्षी देशात १०५ झाल्याची माहिती समोर आली आहे. यात वाघांची राजधानी मानल्या जाणाऱ्या मध्य प्रदेशात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. ६१ टक्के वाघांचे मृत्यू हे प्रकल्प व अतिसंरक्षित भागात झाल्याने हा चिंतेचा विषय मानला जात आहे. भारतात २०१८मध्ये करण्यात आलेल्या व्याघ्रगणना सर्वेक्षणात भारतातील वाघांची संख्या वाढल्याची नोंद करण्यात आली होती. यामध्ये देशात सुमारे २ हजार ९६७ वाघ असल्याची नोंद झाली. ही संख्या जगभरातील एकूण व्याघ्रसंख्येच्या सुमारे ७५ टक्के आहे. त्यामुळे व्याघ्रसंवर्धनात केलेल्या कामांना यश आले होते. पण, २०२०मध्ये देशात १०५ वाघांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाने दिली आहे. यात मध्य प्रदेशात सर्वाधिक २९, तर महाराष्ट्रात १६ मृत्यू झाले आहेत. ६४ वाघांचे मृत्यू देशातील विविध भागातील व्याघ्रप्रकल्प व अतिसंरक्षित भागात झाले आहेत. त्यात शिकारीच्या घटनांचादेखील समावेश आहे. महाराष्ट्रात १६पैकी नऊ मृत्यू हे प्रकल्प व अतिसंरक्षित भागात झाले आहेत. त्यामुळे आता प्रकल्प व अतिसंरक्षित भागात करडी नजर ठेवण्याची गरज प्रतिपादित केली जात आहे. दरम्यान, राज्यात झालेल्या व्याघ्रमृत्यूत काही धक्कादायक घटना समोर आल्या. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील बफरमधील मुधोली येथील शेतशिवारात २४ जुलैला सुमारे ११ महिन्यांपूर्वी एका वाघाची वीजप्रवाह सोडून शिकार केल्याची घटना समोर आली. ताडोब्याच्या बफर झोनमधील मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या सीतारामपेठ नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक ९५६मध्ये १० जून २०२० रोजी पूर्ण विकसित झालेली वाघीण व तिच्या दोन बछड्यांची विष देऊन शिकार करण्यात आली होती. तर ब्रह्मपुरी वनविभागातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रामध्ये ३ नोव्हेंबर रोजी वाघाची शिकार झाली होती. ही शिकार एप्रिल महिन्यात लॉकडाउन काळात झाल्याचे उघड झाले आहे. रानडुकरांपासून संरक्षणासाठी शेतीकरिता लावलेल्या विद्युत प्रवाहाद्वारे वाघाचा मृत्यू झाला होता. २०२०मधील व्याघ्रमृत्यू मध्य प्रदेश २९ महाराष्ट्र १६ कर्नाटक १२ तामिळनाडू ८ उत्तर प्रदेश ८ देशातील वाघांचे पाच वर्षांतील मृत्यू - वर्ष मृत्यू २०१६ १२१ २०१७ ११६ २०१८ १०२ २०१९ ९५ २०२० १०५
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2LfGYH3
No comments:
Post a Comment