म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमध्ये शनिवारी ढगाळ वातावरण आणि धुरके याचा पडदा होता. सकाळी बाहेर पडलेल्या मुंबईकरांना वातावरणात फारसा गारवा जाणवत नसूनही धुरके मात्र दिसत असल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. वर्षाच्या अखेरच्या दिवशी असलेल्या प्रदूषणाच्या तुलनेत शनिवारचे प्रदूषण कमी होते. मात्र, तरीही मुंबईच्या 'वाईट' अशी नोंदली गेली. मुंबईच्या सफर या हवामान नोंदवणाऱ्या प्रणालीच्या माहितीनुसार २५९ होता. भांडुप आणि कुलाबा वगळता इतर सगळ्या ठिकाणी शनिवारी हवेची गुणवत्ता घसरली होती. भांडुप येथे गेले काही दिवस हवा समाधानकारक होती. मात्र, दोन दिवसांपासून भांडुप येथील हवेची गुणवत्ताही खालावली आहे. माझगाव, चेंबूर आणि मालाड येथे हवा 'अतिवाईट' होती, तर वरळी, वांद्रे-कुर्ला संकुल, अंधेरी आणि बोरिवली येथे हवेची गुणवत्ता 'वाईट' होती. या सगळ्या केंद्रांवर पीएम २.५च्या प्रभावामुळे हवेचा स्तर खालावल्याचे निदर्शनास आले. शनिवारी हवेच्या खालच्या थरापेक्षा वरचा थर अधिक थंड होता, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या परिस्थितीत वरच्या थरामध्ये प्रदूषके साचून राहिली. ही प्रदूषके दीर्घ काळ साचून राहिल्याने मुंबईवर धुरक्याचे वातावरण निर्माण झाले. यामुळे फारसा सूर्यप्रकाशही अनुभवता आला नाही, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागातर्फे देण्यात आली. यासोबतच मुंबईमध्ये शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळेही वातावरणात काहीसा निरुत्साह जाणवत होता. वायव्य भारत आणि त्याला लगतच्या मध्य भारतामध्ये आग्नेय दिशेकडून वाहणारे वारे आणि पश्चिमी प्रकोपाची स्थिती या दोन्हीमुळे ३ ते ५ जानेवारीदरम्यान मध्य भारतातही ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. उत्तर मध्य महाराष्ट्रामध्येही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचा परिणाम मुंबईवरही होत आहे. किमान तापमान वाढले मुंबईमध्ये शनिवारी किमान तापमान चढले होते, तर ढगाळ वातावरणानंतर कमाल तापमानाचा पारा खाली उतरला. कमाल तापमान शुक्रवारपेक्षा सुमारे तीन अंशांनी खाली उतरले. तर किमान तापमान दोन अंशांनी वर चढले. कुलाबा येथे २८.८ अंश से. कमाल तापमान होते, २३ अंश सेल्सिअस किमान तामपान होते. सांताक्रूझ येथेही कमाल आणि किमानमध्ये फारसा फरक नव्हता. कमाल तापमान ३०.१, तर किमान तापमान २२.७ अंश सेल्सिअस होते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3pJYhzi
No comments:
Post a Comment