Breaking

Friday, January 1, 2021

राज्यात आज ड्राय रन; 'या' जिल्ह्यांत लसीकरणाची रंगीत तालीम https://ift.tt/3hEjhEz

म. टा. प्रतिनिधी, करोना प्रतिबंधक लसीकरणाची रंगीत तालीम आज (शनिवारी) पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यातील प्रत्येकी तीन आरोग्य केंद्रांवर होणार असून, प्रत्येक केंद्रांवर २५ जणांना त्यासाठी निवडण्यात आले आहे. पुण्यातील औंध येथील शासकीय रुग्णालय, हद्दीतील जिजामाता आरोग्य केंद्र आणि मुळशी तालुक्यातील माण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ही रंगीत तालीम होणार असून, त्यामध्ये केवळ प्रत्यक्ष लस न टोचता लसीकरणाची सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. करोना प्रतिबंधक लशीच्या आपत्कालीन वापरासाठी (इमर्जन्सी यूज) लवकरच परवानगी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर चार टप्प्यांत मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची पूर्वतयारी म्हणून लसीकरणाची रंगीत तालीम (ड्राय रन) देशभरात राबविण्यात येत आहे. राज्यात पुण्यासह नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड त्यासाठी करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील तीन आरोग्य केंद्रे 'व्हॅक्सिनेशन साइट' म्हणून निवडण्यात आली असून, लस उपलब्ध झाल्यावर लसीकरण सत्र कसे राबविले जाईल, याचे 'मॉक ड्रील' केले जाणार आहे. अशी होणार रंगीत तालीम - लस घेण्यासाठी प्रत्येक आरोग्य केंद्रावर २५ लाभार्थ्यांना बोलविणार. - प्रतीक्षा कक्षात (वेटिंग रुम) पडताळणी यादीतील लाभार्थ्यांनाच प्रवेश. - लसीकरण कक्षात लाभार्थ्याला लस टोचली जाईल. - निरीक्षण कक्षात लसीकरणानंतर लाभार्थ्याला ३० मिनिटे निरीक्षणासाठी थांबविले जाईल. - को-विन पोर्टलद्वारे लसीकरण सत्राचा दिनांक आणि पुढील डोसचा दिनांक लाभार्थ्याच्या मोबाइलवर पाठविण्यात येईल. पाच सदस्यांचे पथक लसीकरणाच्या ठिकाणी सुरक्षारक्षक, पडताळणी करणारा (व्हेरिफायर), लसटोचक (व्हॅक्सिनेटर), निरीक्षक (ऑब्झर्व्हर) आणि संघटक (मोबिलायजर) असे पाच कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. सुरक्षारक्षक लाभार्थ्यांना सुरक्षित वावर राखण्यास सांगणार आहे, पडताळणी करणारा कर्मचारी लाभार्थ्यांची को-विन पोर्टलवरील माहिती, त्याचे नाव आणि ओळखपत्र तपासणार आहे, त्यानंतर लसटोचक लाभार्थ्याला लस देणार आहे. लस दिल्यावर निरीक्षक लाभार्थ्याचे तीस मिनिटे निरीक्षण करणार असून, लाभार्थ्याला लसीकरणाच्या ठिकाणी बोलवून आणण्याचे आणि गर्दी नियंत्रित करण्याचे काम संघटक करणार आहे. विपरीत परिणाम उद्भवल्यास सज्जता प्रत्येक लसीकरणाच्या सत्राच्या ठिकाणी अॅनाफिलॅक्‍सीस कीट राहणार आहे, तसेच 'अॅडव्हर्स इव्हेंट फॉलोइंग इम्युनायजेशन सेंटर'ची (एईएफआय) संपूर्ण माहिती उपलब्ध असेल. मध्यवर्ती हेल्‍पलाइन क्रमांक १०४/१०८ वर संपर्क साधून, प्रत्यक्षात रुग्णवाहिकेला बोलावून लाभार्थ्याला 'एईएफआय सेंटर'मध्ये दाखल करण्याची रंगीत तालीमही केली जाणार आहे. आरोग्य विभागाच्या आदेशानुसार करोना प्रतिबंधक लसीकरणाची रंगीत तालीम करण्यात येणार असून, त्यामध्ये प्रत्यक्षात लसीकरणाशिवायच्या सर्व प्रक्रिया केल्या जाणार आहेत. - डॉ. दिलीप पाटील, राज्य लसीकरण अधिकारी


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3o8XSFU

No comments:

Post a Comment