म. टा. विशेष प्रतिनिधी, येत्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर करोना संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी तसेच सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर , विधान परिषदेचे सदस्य तसेच अधिवेशनामध्ये सहभागी होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी पालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही. आज, गुरुवारी यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. हे लसीकरण पालिकेने निर्धारित केलेल्या लसीकरण केंद्रांमध्ये होईल की इतरत्र नव्या केंद्रांमध्ये यावरही चर्चा करण्यात येणार आहे. यापूर्वी जे प्राधान्यक्रम ठरवण्यात आले होते त्याच प्राधान्यक्रमाने लसीकरण होणार का, याची चर्चाही लसीकरण केंद्रांवर होती. बुधवारी पालिकेच्या विविध लसीकरण केंद्रांमध्ये झालेल्या लसीकरणाला समाधानकारक प्रतिसाद मिळाला. सेव्हन हिल या नव्या लसीकरण केंद्रामध्ये पहिल्या दिवशी ३७६ जणांनी लसीकरणाची सुविधा घेतली. एकूण ११ केंद्रांमध्ये ५,१९७ जणांचे लसीकरण करण्यात आले. हे प्रमाण ६८ टक्के इतके नोंदवण्यात आले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. सेव्हन हिल या केंद्रामध्ये सुविधा वाढवण्यात आल्यामुळे टक्केवारी खाली आल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आत्तापर्यंत या सर्व केंद्रांमध्ये २३ हजार ३९९ जणांना लसीकरण करण्यात आले आहे. बीडीबीए केंद्रात ८२९, राजावाडीमध्ये ७८३, बीकेसी जंबो सेंटरमध्ये ५५७, व्ही. एन. देसाईमध्ये २१८, नायर रुग्णालयामध्ये ५३४ जणांना लसीकरणाची सुविधा देण्यात आली. जेजे रुग्णालयामध्ये बुधवारीही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस घेण्याचे प्रमाण कमी होते. बुधवारी अवघ्या १८ जणांनी येथे लस घेतली. या रुग्णालयामध्ये कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांचे प्रमाण १६३ इतके नोंदवण्यात आले आहे. एकूण ७ हजार ७०० आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचे लक्ष्य होते. मागील आठवड्यापेक्षा प्रतिसाद वाढता असल्याचे लसीकरण केंद्रावरील डॉक्टरांनी सांगितले. कोविन अॅपच्या तक्रारी मागील आठवड्यापेक्षा कमी झाल्या असल्या तरीही अनेक ठिकाणी इंटरनेटच्या कनेक्टिव्हिटीची अडचण भेडसावत आहे. आठ जणांमध्ये सौम्य तक्रारी करोना प्रतिबंधाची लस घेतल्यानंतर आठ जणांमध्ये विविध प्रकारच्या सौम्य तक्रारी दिसून आल्या. त्यांना काही काळ वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर सोडण्यात आले. वैद्यकीय उपचारांसाठी कुणालाही रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले नाही. त्यामुळे लसीकरणाच्या प्रक्रियेला घाबरू नये. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण हाच खात्रीशीर मार्ग असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3opNV6n
No comments:
Post a Comment