म. टा. प्रतिनिधी, एकदा लोकल सर्वांसाठी सुरू झाली की, सर्व पंचाईत मिटेल व नेहमीप्रमाणे व्यवहार सुरू होतील, ही कर्मचारी व त्यांच्या मालकांची आशा लोकलमुभाच्या वेळांमुळे फोल ठरली आहे. दुपारनंतरच प्रवास करण्याची अट २५ लाखांहून अधिक चाकरमान्यांसाठी बिनउपयोगाची ठरल्याचे चित्र मुंबईनगरीत दिसून येत आहे. (Mumbai Local Trains) सर्वसामान्यांसाठी सोमवार, १ फेब्रुवारीपासून मर्यादित वेळेत लोकलमुभा सुरू झाली खरी, पण त्याचा लाभ सर्वसामान्य चाकरमान्यांना फार कमी झालेला दिसत होता. मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक नगरीत सर्वाधिक सर्वसामान्य चाकरमानी हे किरकोळ दुकाने, विविध क्षेत्रातील घाऊक बाजारपेठा, लहान-मोठ्या व्यापाऱ्यांकडे काम करतात. अशा कर्मचाऱ्यांचा आकडा हा २५ लाखांहून अधिक आहे. हे मुंबईतील सर्वाधिक रोजगाराचे क्षेत्र आहे. या क्षेत्रातील विविध कार्यालये, बांधकाम साइट यामध्ये १० लाखांच्या घरात कर्मचारी कार्यरत आहेत. त्याखेरीज देशातील जवळपास ६० टक्के उलाढाल करणारा सराफा बाजार हा सोने-चांदीचा हब आहे. यामधील रोजगाराचा आकडा हा ६ लाखांच्या घरात आहे. देशातील बहुसंख्य भागात कपड्यांची फॅशनही मुंबईतून पुरवली जाते. त्यामुळेच येथील कापड व्यवसायात ३ ते ४ लाख कर्मचारी कार्यरत आहेत. याखेरीज ऑटोमोबाइल, बांधकाम साहित्य, अन्य किरकोळ क्षेत्र या सर्वांमधील रोजगाराचा आकडा जवळपास ५ लाखांच्या घरात आहे. हे सर्व कर्मचारी राज्य सरकारच्या अत्यावश्यक श्रेणीत येत नाहीत. पण या सर्वांचा व्यवसाय बघता त्यांना प्रत्यक्ष कामावर उपस्थित राहणे अत्यावश्यक असते. पण त्यांच्यासाठी 'लोकलमुभा' दुपारी १२नंतर असल्याने त्यांना काहीदेखील उपयोग झालेला नाही. आमचा त्रास कायम 'लॉकडाउननंतर लोकल नसल्याने कामावर पोहोचण्यासाठी आमची तारेवरची कसरत सुरू होती. लोकल सुरू झाली की ही कसरत थांबेल, अशी आशा होती. पण सर्वांसाठी लोकलची वेळ दुपारी १२नंतर ठेवल्याने आशा फोल ठरली. आता दुपारी १२ किंवा १ किंवा २नंतर कामावर येऊ का, असे मालकाला विचारणार का? मालकदेखील त्याला होकार देईलच कसा? ही वेळ अत्यंत चुकीची आहे. त्यामुळे आमचा कामावर पोहोचण्याचा त्रास कायम आहे.' - पुरुषोत्तम कोचेकर, सराफा दुकानातील कर्मचारी
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2YDF3Qh
No comments:
Post a Comment