मुंबई : दोन दिवस विश्रांतीनंतर पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा झटका दिला आहे. आज मंगळवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ झाली आहे. आज पेट्रोल ३५ पैशांनी आणि डिझेल ३५ पैशांनी महागले आहे. good returns वेबसाईटनुसार राज्यात परभणीमध्ये पेट्रोलचा भाव सर्वाधिक ९९.४५ रुपये झाला आहे. यापूर्वी रविवार आणि सोमवार असे सलग दोन दिवस पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर होते. तर त्याआधी सलग १२ दिवस कंपन्यांनी इंधन दरात वाढ केली होती. या १२ दिवसात पेट्रोल ३.२८ रुपयांनी महागले आहे. तर जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात पेट्रोल ६.७७ रुपयांनी महागले आहे. मागील १२ दिवसात डिझेल ३.४९ रुपयांनी महागले होते. तर जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात झालेल्या दरवाढीने डिझेलच्या किमतीत ७.१० रुपये वाढ झाली. आज मंगळवारी मुंबईत पेट्रोल ९७.३४ रुपयांपर्यंत वाढले आहे. मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव ८८.४४ रुपये झाला आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९०.९३ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८१.३२ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९२.९० रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८६.३१ रुपये भाव आहे. कोलकात्यात आज पेट्रोल ९१.१२ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८४.२० रुपये झाला आहे. बंगळुरात पेट्रोल ९३.९८ रुपये असून डिझेल ८६.२१ रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक ८९.६० रुपयांचा विक्रमी दर आहे. भोपाळमध्ये आज पेट्रोलचा दर ९८.९६ रुपये आहे.इंधन दरवाढीने महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता आहे. या दरवाढीवरून विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर टीका करण्यात येत आहे. इंधनावर दुहेरी कर असल्याने त्याच्या किमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडने ६५ डाॅलरची पातळी ओलांडली आहे. अमेरिकेतील हिमवादळाने तेथील कच्च्या तेलाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला असून किमतीमध्ये तेजी कायम आहे. नजीकच्या काळात कच्चे तेल ७० डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. सोमवारी सिंगापूर एक्सचेंजमध्ये ब्रेंट क्रूडचा भाव ६५ डॉलरवर पोहोचला. लंडन क्रूड एक्सचेंजमध्ये तेलाच्या किमतीनी २.२५ डॉलरची वाढ नोंदवली आणि तो ६१.४९ डॉलरवर गेला. ब्रेंट क्रूड २.३३ डॉलरच्या तेजीसह प्रती बॅरल ६५.२४ डॉलरवर गेला आहे. देशात पेट्रोल आणि इंधनाचे दर जागतिक बाजाराशी संलग्न केले आहे. पेट्रोलियम कंपन्या दररोज सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचा दर निश्चित करतात. देशातील एकूण मागणीच्या जवळपास ९० टक्के कच्चे तेल आयात केले जातात. तेल आयातीचा खर्च आणि चलन विनिमय दर या घटकांचा तेलाची किंमत ठरवताना परिणाम होतो.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3unJwVI
No comments:
Post a Comment