म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई सचिन वाझे प्रकरणापासून ते लाचखोरीपर्यंत विविध कारणांनी पोलिस दलाची नाचक्की सुरू असतानाही, ठाण्याचे वैद्यकीय अधिकारी व्हेन्टिलेटर खरेदी व्यवहारात पाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना अटक होतात... करोनाकेंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याऐवजी प्राणवायूच्या तुटवड्यापायी २६ रुग्णांचेच स्थलांतर करावे लागते... या व अशा अनेक घटनांमुळे शहर व जिल्ह्यातील आरोग्ययंत्रणेतील अनागोंदी चव्हाट्यावर आली आहे. तरीही राज्य सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. गेल्या आठवडाभरात ठाण्यातील आरोग्यव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघाले आहेत. मिरा-भाईंदरपासून कल्याण-डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथपर्यंत मिळविताना रुग्णांच्या नातलगांच्या नाकीनऊ आले आहेत. अन्न व औषध प्रशासनाने औषधांचा साठा असल्याचा निर्वाळा दिला असला, तरी प्रत्यक्षात रुग्णांना मात्र उलट अनुभव येत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी सात हजार रुपयांपर्यंत दर आकारला गेल्याच्या तक्रारी आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने शनिवारी दोघांना रेमडेसिवीरच्या काळ्या बाजाराबद्दल अटक करून त्यांच्याकडून २१ इंजेक्शन जप्त केली. त्यांनी ही इंजेक्शन ठाण्याच्या कोविड केंद्रातूनच घेतली असल्याची धक्कादायक बाब उघड झाली. या इंजेक्शनची पाच ते दहा हजारांना विक्री होत असल्याचेही उघड झाले. या इंजेक्शनवर 'नॉट फॉर सेल' असा शिक्काही आढळला. मुंब्रा-कौसा येथे म्हाडाने उभारलेल्या रुग्णालयातील ९४ व्हेन्टिलेटर व अन्य सामग्रीची चोरी झाल्याचा आरोप चार दिवसांपूर्वीच गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. त्यांनी थेट वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांच्यावरच शरसंधान केले होते व व्हेन्टिलेटर परत न आल्यास फिर्याद करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर व्हेन्टिलेटर तेथे परत आली होती. त्यामुळे चोरी, अफरातफरीच्या गुन्ह्याचा प्रश्न काही काळ निकाली निघाला. मात्र दोनच दिवसांत डॉ. मुरुडकर यांना पाच लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपतविरोधी विभागातर्फे अटक करण्यात आली. एकीकडे रुग्णांना श्वास घ्यायला त्रास होत असताना व्हेन्टिलेटर खरेदीसाठी पैशाचे व्यवहार होतात, याबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. त्यांनी निविदेच्या रकमेच्या दहा टक्के लाचेची मागणी केल्याचे समोर आले आहे. या सर्व प्रकारांविषयी ठाण्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही 'महाराष्ट्र टाइम्स'ने अनेकदा संपर्क केला, मात्र त्यांच्याकडूनही काहीही प्रतिसाद मिळाला नाही. नातेवाईकांची धावपळ ठाणे येथे हा सावळागोंधळ सुरू असतानाच कल्याण-डोंबिवली येथे रुग्णांसाठी खाटा मिळविणे व रेमडेसिवीर मिळविणे, यात रुग्ण व नातलगांची फरफट सुरू आहे. चाचण्यांचा वेग मंदावला असून चार हजार चाचण्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. एकेका रुग्णासाठी सहा-सहा रेमडेसिवीरची व्यवस्था करण्यास सांगण्यात येते, तेव्हा त्यांची गाळण उडत आहे. महामुंबईला विविध प्रकारचे मनुष्यबळ पुरवणाऱ्या ठाणे जिल्ह्याकडे कमालीचे दुर्लक्ष होत असून राज्य सरकारने यात गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणी ठाणेकर करत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2OJOpZs
No comments:
Post a Comment