Breaking

Tuesday, May 18, 2021

वडिलांना नीट वागवा, अन्यथा पोलिसांकरवी घराबाहेर काढू: हायकोर्ट https://ift.tt/2RtMvxo

माझा मुलगा शीघ्रकोपी असून हातही उगारतो. मी व्यवसाय मुलाच्या नावे केलाय. आयुष्याचे अखेरचे दिवस शांततेत घालवायचे आहेत... -वडिलांची तक्रार वडिलांना नीट वागवता येत नसल्यास तुमची स्वतंत्र व्यवस्था करा. अशीच वर्तणूक राहिली, तर तुम्हाला घराबाहेर काढण्याचा आदेश देऊ... -न्यायालयाचा मुलाला इशारा म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई 'वडिलांना त्रास देत असाल तर तुम्हाला घराबाहेर काढण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. तुमची वडिलांविषयीची वर्तणूक अशीच चुकीची राहिली, तर आम्हीच तुम्हाला पोलिसांकरवी घराबाहेर काढण्याचा आदेश देऊ', असा सज्जड दम मुंबई उच्च न्यायालयाने दक्षिण मुंबईतील एकाला सोमवारी दिला. 'माझा मुलगा मला सतत त्रास देत असून, त्याच्यापासून मला धोका आहे', अशी भीती व्यक्त करत मुलाविरोधात याचिका करणाऱ्या ८०वर्षीय पित्याच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्या. शाहरुख काथावाला व न्या. सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठाने मुलाला फटकारले. मरिन ड्राइव्ह येथील एका इमारतीत आलिशान फ्लॅट असलेले शहाब अन्सारी यांनी त्यांचा मुलगा अन्वर (नावे बदललेली आहेत) याच्या विरोधात ज्येष्ठ वकील अॅड. नितीन ठक्कर यांच्यामार्फत याचिका करून त्याला घराबाहेर काढण्याचे निर्देश देण्याची विनंती केली आहे. 'मी माझा संपूर्ण व्यवसाय मुलाच्या नावे करून टाकला. तरीही तो मला त्रास देत आहे. त्याचा त्याच्या पत्नीशी घटस्फोट झाला आहे. मला माझ्या आयुष्याचे अखेरचे दिवस शांततेत घालवायचे आहेत. परंतु, मुलामुळे मला ते शक्य होत नाही. त्याच्यापासून भीती वाटत असल्याने मागील दोन दिवसांपासून मी माझे हक्काचे घर सोडून हॉटेलमध्ये राहत आहे', अशी कैफियत शहाब यांनी ठक्कर यांच्यामार्फत मांडली. तर 'मी अनेक वर्षे वडिलांसोबत राहत आहे. कठीण प्रसंगांमध्ये मीच त्यांची काळजी घेतली आहे. मात्र, आता जर्मनीत राहणारी माझी बहीणच माझ्याविरोधात त्यांचे कान भरत आहे. त्यांनी माझ्यावर लावलेले सर्व आरोप खोटे आहेत', असा दावा अन्वरने केला. 'मी वडिलांकडून व्यवसायाचे कार्यालय ताब्यात घेतले, तेव्हा त्यांचा व्यवसाय शून्यावर आलेला होता. नंतर मी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय सुरू केला. मात्र, करोनामुळे मागील दीड वर्षापासून तो ठप्प आहे. त्यामुळे मला घराबाहेर काढल्यास मी अक्षरश: रस्त्यावर येईन', असे म्हणणेही अन्वरने मांडले. त्यानंतर खंडपीठाने थेट शहाब यांच्याशी संवाद साधला. 'माझा मुलगा हात उगारत असतो. पूर्वी त्याने त्याच्या आईवरही हात उचलला होता. मलाही तो मारहाण करेल, अशी भीती वाटत राहते. त्यामुळे त्याच्यासोबत राहण्याची मुळीच इच्छा नाही', असे म्हणणे शहाब यांनी मांडले. त्यानंतर 'तुम्हाला वडिलांना नीट वागवता येत नसेल तर तुम्ही तुमची स्वतंत्र व्यवस्था करा', असा सल्ला खंडपीठाने अन्वरला दिला. 'याचिकेतील आरोपांना उत्तर देण्यासाठी मला किमान दोन आठवड्यांची मुदत द्यावी', अशी विनंती अन्वरने वारंवार केली. मात्र, खंडपीठाने त्याला प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी केवळ दोन दिवसांची मुदत देऊन बुधवारी (१९ मे) वकिलामार्फत युक्तिवाद मांडण्याचे निर्देश दिले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2SXallr

No comments:

Post a Comment