म. टा. प्रतिनिधी, मुंबईः करोनायोद्ध्यांच्या अथक प्रयत्नांमुळे मुंबईतील करोनावर नियंत्रण मिळवण्यात यश येताना दिसत आहे. शहरातील करोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याने पुन्हा एकदा अन्य राज्यांतील नागरिकांची पावले मुंबईकडे वळू लागली आहेत. रेल्वे-रस्तामार्गे रोज ८० हजार नागरिक मुंबईत येत असतानाच यांच्या तपासणीत अक्षम्य ढिसाळपणा असल्याचे वास्तव उजेडात आले आहे. यामुळे येत्या काही दिवसांत करोनाचा संसर्ग पुन्हा फोफावण्याची भीती व्यक्त होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, वांद्रे टर्मिनस आणि मुंबई सेंट्रल ही टर्मिनस वगळल्यास अन्य रेल्वे स्थानकांवर उतरणाऱ्या प्रवाशांची कोणत्याही प्रकारे चाचणी केली जात नाही अथवा त्यांची नोंद ठेवली जात नाही. ही स्थिती कायम राहिल्यास सध्या आटोक्यात येत असलेली करोनाची दुसरी लाट भविष्यात पुन्हा उग्र रूप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यांतर्गत धावणाऱ्या गाड्या कमी प्रतिसादामुळे रद्द करण्यात येत असल्या तरी उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, प. बंगालमधून येणाऱ्या गाड्यांची संख्या वाढत आहे. मध्य रेल्वेवर रोज सरासरी ४० हजार आणि पश्चिम रेल्वेवर सरासरी ३० हजार नागरिक मुंबईत दाखल होत आहेत. परराज्यांतून मध्य रेल्वेवर रोज ६० आणि पश्चिम रेल्वेवर १४५ रेल्वेगाड्या मुंबईत येतात, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. मुंबई सेंट्रल, दादर, कुर्ला नेहरूनगर, परळ, पनवेल या मुंबई विभागात रोज १० हजार प्रवासी एसटीने शहरात येत आहेत. ६० ते ७० खासगी ट्रॅव्हल्समधून रोज सुमारे दोन हजार प्रवासी मुंबईत येतात. बस प्रवासासाठी आरटीपीसीआरचा निगेटिव्ह अहवाल आवश्यक आहे. मात्र या अहवालाची सत्यता तपासणीची कोणतीही यंत्रणा टोलनाके, सीमा तपासणी नाके या ठिकाणी अस्तित्वात नाही. तपासणी होणार नसेल तर चाचण्यांचा आर्थिक भार प्रवाशांनी का सोसावा, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. खासगी ट्रॅव्हल्सचे फावले प्रवासी नसल्याने तोटा वाढू नये यासाठी एसटी महामंडळाची मुख्य मार्गावरील एसटी वाहतूक बंद करण्यात आली. याचा फायदा खासगी ट्रॅव्हल्सला होत असून प्रवाशांकडून दुप्पट-तिप्पट भाडे वसूल केले जाते. राज्यातील ७५० एसटी गाड्यांद्वारे रोज ९४ हजार प्रवाशांची वाहतूक करण्यात येत असल्याचे महामंडळाने सांगितले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3eYrKBP
No comments:
Post a Comment