मुंबई : रिझर्व्ह बँकेने पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. बँकेची आर्थिक स्थिती खालावल्याने रिझर्व्ह बँकेकडून ही कारवाई करण्यात आली. रिझर्व्ह बँकेने सोमवारी शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना रद्द केल्याची माहिती प्रसिद्ध केली आहे. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील ९८ टक्के खातेदार हे ठेवीदार विमा सुरक्षेत आहेत. त्यामुळे या खातेदारांना त्यांची पूर्ण रक्कम मिळेल, असे आरबीआयने म्हटलं आहे. बँकिंग परवाना रद्द झाल्याने आजपासून ( १ जून २०२१) शिवाजीराव भोसले सहकारी बँकेला बँकिंग व्यवसाय करता येणार नाही. ठेवीदार विमा आणि पत हमी महामंडळ () कायदा १९६१ नुसार बँक बंद करण्याची आणि ठेवीदारांचे पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे. सहकारी संस्थांच्या रजिस्ट्रारला बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करून बँकेला रितसर बंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बँकेची आर्थिक स्थिती खालावत चालली होती. त्यामुळे विद्यमान खातेदारांना देखील बँकेकडून पूर्ण पैसे परत मिळाले नसते. खातेदारांचे हित लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केल्याचे म्हटलं आहे. ४ मे २०१९ पासून शिवाजीराव भोसले बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले होते. तेव्हापासून रिझर्व्ह बँकेकडून शिवाजीराव भोसले बँकेच्या आर्थिकस्थितीचा आढावा घेण्यात येत होता.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3uEI6oI
No comments:
Post a Comment