Breaking

Wednesday, May 26, 2021

मृत डॉक्टरांचे कुटुंबीय वाऱ्यावर; देशभरात ५१३ डॉक्टरांचा करोनामुळे मृत्यू https://ift.tt/3fGRId6

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये देशातील ५१३, तर राज्यातील १५ खासगी वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी प्राण गमावले आहेत. मात्र त्यांच्या कुटुंबीयांना केवळ खासगी वैद्यकीय सेवा देत होते या कारणास्तव विमा योजनेचा लाभ देण्यात आलेला नाही. त्यामुळे सरकार यावर गांभीर्याने विचार करणार का, असा प्रश्न वैद्यकीय क्षेत्रातील या करोनायोद्ध्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. करोना काळात सेवा बजावताना मृत्युमुखी पडलेल्या डॉक्टरांपैकी काही जण प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेचच करोनारुग्णांच्या सेवेत दाखल झाले होते. आपल्या मुलांना वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी गोरगरीब कुटुंबातल्या या डॉक्टरांच्या पालकांनी सगळी मिळकत खर्च केली होती. करोना काळामध्ये मुलगा गमावल्यानंतर आता अनेक वयोवृद्ध पालकांना कुणाचाच आधार नाही, अशी बिकट अवस्था झाली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी राज्यात इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य असलेल्या १५ डॉक्टरांना प्राण गमावावे लागल्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. हा आकडा त्यापेक्षाही मोठा आहे, असेही त्यांनी सांगितले. देशाभरात एकूण ५१३ डॉक्टरांनी करोना संसर्गाच्या काळामध्ये प्राण गमावले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधानांच्या विमा योजनेचा लाभ अद्याप मिळालेला नाही. सरकारने सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील प्राण गमावलेल्या किती करोनायोद्ध्यांना विम्याची रक्कम संमत केली हे जाहीर करावे, अशी स्पष्ट भूमिका डॉ. भोंडवे यांनी मांडली. संसर्गाची पर्वा न करता या डॉक्टरांनी रुग्णसेवा करताना दिलेले हे बलिदान आहे. मात्र त्याची दखल सरकारने घेतली नसल्याची खंत 'आयएमए'चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयेश लेले यांनी व्यक्त केली. मृत्युमुखी पडलेल्या करोनायोद्ध्यांची माहिती आयएमए गोळा करत आहे. सरकारने या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. केंद्र आणि राज्य सरकारने या माहितीचे संकलन करायला हवे. जे कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत त्यांना कायमस्वरूपी सेवेमध्ये घ्यायला हवे. तसेच संसर्ग झाल्यास निःशुल्क वैद्यकीय उपचार मिळण्यासह त्यांच्या कुटुंबीयांना कायमस्वरूपी सेवेमध्ये सामावून घ्यायला हवे, अशी मागणी डॉ. रवी वानखेडकर यांनी केली आहे. 'सरकारने विचार करावा' विमा योजनेचा लाभ न मिळाल्यामुळे खासगी क्षेत्रातील डॉक्टरांनी एकत्र येऊन हुतात्मा निधी जमा केला व शक्य तितकी मदत या डॉक्टरांच्या कुटुंबीयांना करण्याचा प्रयत्न केला. यातील अनेक डॉक्टर कुटुंबामध्ये एकटेच कमावते होते. त्यांच्या मुलांचेही शिक्षण अद्याप पूर्ण झालेले नाही. नर्सिंग होम सुरू करण्यासाठी घेतलेल्या कर्जाची रक्कमही अद्याप फिटलेली नाही. या सगळ्या परिस्थितीचा विचार सरकारने करायला हवा, अशी मागणी डॉक्टरांच्या संघनटेने केली आहे. करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या डॉक्टरांची संख्या महाराष्ट्र - १५ आंध्र प्रदेश - २९ आसाम - ६ बिहार - ९६ छत्तीसगड - ३ दिल्ली - १०३ गुजरात - ३१ गोवा - २ हरयाणा - २ जम्मू-काश्मीर - ३ झारखंड - २९ कर्नाटक - ८ मध्य प्रदेश - १३ ओडिशा - १६ पाँडिचेरी - १ पंजाब - १ राजस्थान - ३९ तमिळनाडू - १८ उत्तर प्रदेश - ४१ प. बंगाल - १९ उत्तराखंड - २ एकूण - ५१३


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2TlO3Kt

No comments:

Post a Comment