म. टा. विशेष प्रतिनिधी, राज्यातील अनेक रुग्णांना करोनापश्चात म्युकरमायकोसिसचा (बुरशी संसर्ग) त्रास होत आहे. या आजारात एम्फोटोरिन बी या इंजेक्शन दिले जाते. मात्र ते उपलब्ध होण्यात अडथळे येत असल्याने उपचारादरम्यान अडचणी येत आहे. पालिका रुग्णालयांमध्ये या इंजेक्शनची उपलब्धता नसल्याने उपचार कसे करणार, असा प्रश्न डॉक्टरांनी उपस्थित केला आहे. मुंबईमध्ये खासगी रुग्णालयांनाही हे इंजेक्शन उपलब्ध होण्यात अडचणी जाणवत आहेत. मागील काही दिवसांपासून पिवळी, पांढरी बुरशी असलेले रुग्ण सापडत असल्याची चर्चा आहे. मात्र त्यात पूर्णपणे तथ्य नाही. चर्चा करावी इतके या रुग्णांचे प्रमाण मोठे नाही. त्यामुळे बुरशीमध्ये हा रंगभेद कुणी केला, असाही प्रश्न यानिमित्ताने वैद्यकीय तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रीय ईएनटी संघटनेचे अध्यक्ष डॉ. समीर भार्गव यांनी, बुरशीचे इतके रंग कसे व कुणी उत्पन्न केले, असा प्रश्न उपस्थित केला. कोणत्याही बुरशीला स्वतःचा रंग नसतो. ज्या माध्यमावर या बुरशीचा फैलाव होतो, त्यानुसार त्याचा रंग ठरतो. म्युकरला काळी बुरशी म्हटले जाते, कारण त्यामुळे रक्तप्रवाह बाधित होतो. पेशी मृत होऊन त्यांचा रंग आधी पांढरा होतो. त्यानंतरच्या टप्प्यात या मृत पेशींचा रंग काळा होतो. पांढऱ्या बुरशीला कँडिडा संसर्ग म्हटले जाते. हा तोंडात, कानामध्ये असू शकतो. या कोणत्याही प्रकारच्या बुरशीचा स्वतंत्र असा रंगानुसार उल्लेख नमूद करण्यात आलेला नाही. उत्तर प्रदेशमध्ये काही डॉक्टरांनी अशा प्रकारच्या बुरशी संसर्ग झाल्याचे सांगितले. मात्र म्युकरमध्ये अशा कोणत्याही प्रकारचा रंग दिसून आलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 'रंगावर चर्चा नको' मुंबईतील चार रुग्णालयांतील १९० रुग्णांवर म्युकरमायकोसिसचे उपचार सुरू आहेत. हा दुर्मिळ संसर्ग आहे. टास्क फोर्सचे सदस्य व ईएनटीतज्ज्ञ डॉ. आशीष भूमकर यांनी, म्युकरच्या रुग्णांचे प्रमाण वेगाने वाढलेले नाही त्यामुळे काळजी करू नये. तसेच रंगांनुसार या बुरशीचे भेद करून त्यावरून विनाकारण चर्चा करून लोकांनी घाबरून जाऊ नये', असे आवाहन केले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3ftL0Z5
No comments:
Post a Comment