म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्यात १५ जूनपर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढला असताना मुंबईत काही घटकांमधील निर्बंध शिथिल झाले आहेत. त्यात अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंची आठवड्यातून पाच दिवस आलटून पालटून सुरू ठेवण्यास पालिकेने अनुमती दिली आहे. पालिकेने सोमवारी जारी केलेल्या परिपत्रकानुसार पहिल्या लॉकडाउनच्या धर्तीवर दुकाने सुरू ठेवण्याचे तंत्र अवलंबले आहे. अत्यावश्यक नसलेली दुकाने शनिवारी आणि रविवारी पूर्णपणे बंद राहतील, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. मुंबईतील अत्यावश्यक दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरू ठेवता येणार आहेत. त्याचवेळी, बिगर अत्यावश्यक दुकाने सोमवारी ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत खुली राहतील. त्यासाठी पालिकेने काही नियम जारी केले आहेत. त्यानुसार, पहिल्या आठवड्यात रस्त्याच्या उजव्या बाजूकडील दुकाने सोमवार, बुधवार, शुक्रवारी खुली राहतील. मंगळवार आणि गुरुवारी रस्त्याच्या डाव्या बाजूकडील दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी आहे. त्यानंतरच्या आठवड्यात रस्त्याच्या डाव्या बाजूकडील दुकाने सोमवार, बुधवार, शुक्रवारी खुली राहतील. तर, मंगळवार आणि गुरुवारी रस्त्याच्या उजव्या बाजूकडील दुकाने सुरू राहतील. त्यानंतरच्या आठवड्यात त्याचपध्दतीने दुकाने उघडी राहतील. ई-कॉमर्स अंतर्गत आवश्यक घटकांमध्ये समाविष्ट नसलेल्या वस्तूंचेही वितरण करण्यास परवानगी देण्यात आली आहे. अन्यथा कारवाई नियमांची अंमलबजावणी न केल्यास वा विरोध दर्शविल्यास कारवाई केली जाणार आहे. व्यापाऱ्यांनी सुरक्षित अंतर न राखल्यास, मास्क न वापरल्यास कारवाई केली जाईल, असेही पालिका आयुक्त यांनी परिपत्रकात नमूद केले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3vG4QWX
No comments:
Post a Comment