Breaking

Monday, May 3, 2021

मुंबईच्या प्रकृतीत सुधार; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले https://ift.tt/3ti42VY

म. टा. विशेष प्रतिनिधी : गेल्या दीड महिन्यांपासून मुंबईत पुन्हा डोके वर काढलेल्या करोनाचा संसर्ग गेल्या काही दिवसांपासून नियंत्रणात येऊ लागला आहे. ११ हजारांपलीकडे गेलेली दररोजची रुग्ण संख्या झपाट्याने कमी होत साडेतीन हजारांपर्यंत खाली आली आहे. परिणामी रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून शंभर दिवसांहून अधिक झाला आहे; तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांच्या घरात पोहोचले आहे. मुंबईत फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्ण संख्या वाढीस लागली असून पाच, सात हजारांवरून थेट ११ हजारांवर चढता आलेख असल्याने चिंतेचे ढग दाटून आले होते. वाढत्या रुग्ण संख्येमुळे खाटा, ऑक्सिजन या सर्वांवर ताण वाढत चालला असताना गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्येत पुन्हा उतार येऊ लागला आहे. मुंबई शहर व उपनगरातील रुग्ण दुपटीचा कालावधी वीस दिवसांपूर्वी ३५ दिवस इतका होता. १५ एप्रिपासून लागू झालेल्या संचारबंदीनंतर रुग्ण संख्या घटू लागल्याने रुग्ण दुपटीचा कालावधी वाढू लागला आहे. २ मे रोजी हा कालावधी १०५ दिवसांवर पोहोचला आहे. दहिसरमध्ये दुपटीचा वेग अधिक दहिसर आर-उत्तर विभागात सर्वांत कमी रुग्ण दुपटीचा कालावधी असून, तो ७० दिवस इतका आहे. चंदनवाडी, चिरा बाजार, काळबादेवी या सी विभागातील कालावधी १६२ दिवसांवर पोहोचला आहे. दादर जी-उत्तर विभागातील दादर, माहीम, धारावी आणि मुलुंडचा दुपटीचा कालावधी १४७ दिवसांपर्यंत वाढला आहे. घाटकोपर एन विभाग १५० दिवस, चेंबूर एम-पश्चिम १३७ दिवस, कुर्ला एल विभाग १२७ तर एस भांडुप १३० दिवस इतका आहे. दादर, माहीममध्ये आटोक्यात दादर, माहीम, धारावी, वरळी, ग्रँट रोड, अंधेरी पूर्व आणि पश्चिम, वांद्रे पश्चिम या हॉटस्पॉटमधील संसर्ग झपाट्याने कमी होऊ लागला आहे. दादर, माहीम, धारावीत गेल्या काही दिवसांपासून प्रत्येकी ३० ते ५०च्या आत नवीन रुग्ण सापडत आहेत. तर उर्वरित विभागात दररोज १०० ते १५०पर्यंत दररोजची रुग्ण संख्या रोखण्यात यश आले आहे. त्यामुळे या सर्व विभागांत रुग्ण दुपटीचा कालावधी ७० ते १६२ दिवसांवर पोहोचला आहे. दररोज ४० हजारपर्यंतच चाचण्या २० मार्च, २०२० ते १० फेब्रुवारी, २०२१पर्यंत दररोज २४ हजार ५०० चाचण्या केल्या जात होत्या. यंदाच्या १ एप्रिल रोजी सर्वाधिक म्हणजे ५६ हजार चाचण्या करण्यात आल्या. एप्रिलपासून दररोज सरासरी ४४ हजार चाचण्या करण्यात आल्या. चाचण्या ५० हजारांवरून ३८ हजार ते २८ हजारांपर्यंत खाली आणण्यात आल्या तरी संसर्ग रोखला जात आहे. त्यामुळे यापुढे दररोज सरासरी ४० हजारांपर्यंतच चाचण्या करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिली आहे. संसर्ग रोखण्याचा मार्ग पाच रुग्ण आढळले की संपूर्ण इमारत सील केली जाते. एखाद्या मजल्यावर एक रुग्ण सापडला तरी आजुबाजूच्या घरातील सर्वांच्या चाचण्या केल्या जातात. मजला सॅनिटाइझ केला जातो. घरात विलगीकरण केलेल्या रुग्णांसाठी वैद्यकीय पथकांची प्रत्यक्ष भेट किंवा दूरध्वनीवरून संवाद.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3ucFDm6

No comments:

Post a Comment