म. टा. प्रतिनिधी, मुंबईः करोना साथीला आटोक्यात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना आणि नव्याने आलेल्या म्युकरमायकोसिस विकाराच्या उपचारांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री यांनी मंगळवारी मुंबईत दिली आहे. करोनाविरोधातील लढ्याला बळ देण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगातील २५ टक्के निधी आणि गौण खनिज निधीतील रक्कमही आरोग्य सेवेवर खर्च करण्यासाठी मंजुरी देण्यात आल्याचे वित्त व नियोजनमंत्री या नात्याने अजित पवार यांनी स्पष्ट केले. तसेच राज्यातील करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी करोना रुग्णांच्या गृहविलगीकरणाऐवजी संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्यात यावा, अशा स्पष्ट सूचना अजित पवार यांनी दिल्या आहेत. करोनाबाधितांच्या संपर्कात असणाऱ्या हाय-रिस्क, लो-रिस्क व्यक्तींच्या करोना चाचणीवर भर द्यावा. महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत म्युकरमायकोसिस आजारावर मोफत उपचार करणाऱ्या १३१ रुग्णालयांची यादी प्रसिद्ध करावी. राज्यातील रुग्णालयांचे ऑक्सिजन, इलेक्ट्रिक, फायर ऑडिट तातडीने करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. मंत्रालयात पवार यांनी करोनासह म्युकरमायकोसिसच्या राज्यातील परिस्थिती व उपाययोजनांचा आढावा घेतला. या बैठकीस आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, व महत्त्वाचे सनदी अधिकारी उपस्थित होते. म्युकरमायकोसिसच्या आजाराचे पहिल्या टप्प्यात निदान झाल्यावर तातडीने औषधोपचार सुरू केल्यास हा आजार बरा होतो. त्यामुळे अशा रुग्णांवर पहिल्या टप्प्यात उपचार सुरू करावेत. या आजारामुळे कोणाला जीव गमवावा लागणार नाही. म्युकरमायकोसिसच्या औषधांचे नियंत्रण केंद्र सरकारच्या हाती असल्याने प्रत्येक जिल्ह्यांनी म्युकरमायकोसिस रुग्णांची अद्ययावत नोंदणी पोर्टलवर करावी. त्यानुसार आपल्याला औषधांची उपलब्धता होणार आहे. हाफकीन इन्स्टिट्यूटतर्फे काही प्रमाणात म्युकरमायकोसिसच्या औषधांची निर्मिती होणार आहे. तसेच जागतिक निविदाद्वारे हे औषध उपलब्ध होणार आहे. जूनमध्ये या औषधांची उपलब्धता सुरळीत होऊ शकेल. मात्र, रेमडेसिवीरप्रमाणेच जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातूनच या औषधांचे योग्य, प्रभावीपणे वितरण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3fPcXd1
No comments:
Post a Comment