म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकः सरकारला दिलेल्या पाच मागण्यांची मुदत रविवारी (दि. ६) संपणार असून या मागण्या सरकारने मान्य न केल्याने या पुढील आंदोलनाची भूमिका सायंकाळी रायगडावर खासदार संभाजीराजे छत्रपती जाहीर करणार आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागातून अनेक कार्यकर्ते रायगडावर विविध मार्गांनी दाखल झाले आहेत. नाशिकमधूनही हजारो कार्यकर्त्यांची फळी शुक्रवारीच रवाना झाली. मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर यांनी ही माहिती दिली. मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पाच मागण्यांचे निवेदन दिले होते. या मागण्या पाच जूनपर्यंत पूर्ण कराव्यात असा इशारा देण्यात आला होता. या मागण्या मान्य न झाल्यास सहा जून रोजी आंदोलनाची पुढील दिशा जाहीर केली जाईल. असे सांगण्यात आले होते. सायंकाळी होणार बैठक राज्य सरकारने शनिवारपर्यंत (दि. ५) मागण्यांबाबत कोणतेही पाऊल न उचलल्याने आंदोलनाची दिशा आज ठरविली जाणार आहे. आज सायंकाळी चार वाजता राज्यातील महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची बैठक होईल. त्यांनतर सहा वाजता आंदोलनाची दिशा जाहीर केली जाईल, अशी माहिती गायकर यांनी दिली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3fUd34g
No comments:
Post a Comment