म. टा. खास प्रतिनिधी, करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कडक निर्बंध असूनही मुंबई दोन दिवसांपासून गजबजून गेली आहे. मुख्य महामार्गासह गल्लीबोळातील रस्त्यावर वाहनांच्या रांगा, बाजारांमध्ये, दुकानांमध्ये गर्दीच गर्दी आहे. विनाकारण घराबाहेर पडण्यास मनाई असतानाही थातुरमातूर कारणे सांगून बाहेर फिरत आहेत. त्यामुळे नियमांचा पुरता फज्जा उडालेला दिसत असून हा हलगर्जीपणा तिसऱ्या लाटेसाठी कारणीभूत ठरण्याची भीती वाटू लागली आहे. मुंबईतील निर्बंध १ जूनपासून शिथिल करण्यात आले. दुकानांची वेळ दुपारी २ वाजेपर्यंत ठेवण्यात आली. करोनाचे निर्बंध केवळ शिथिल केले असले तरी मुंबईतील चित्र निर्बंध हटविल्यासारखे आहे. पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर पुन्हा पूर्वीप्रमाणेच दोन दिवसांपासून वाहतूककोंडी होऊ लागली आहे. फेरफटका मारण्यासाठी मुंबईकर वाहने घेऊन बाहेर पडत असल्याने गल्लीबोळातील रस्त्यावरील वाहतूकही धीम्या गतीने सुरु आहे. वाहनांची गर्दी आणि त्यातच तपासणीसाठी ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी लावली आहे. किराणा, भाजीपाला आणण्यासाठी जात आहे, औषधे किंवा लस घेण्यासाठी जात आहे, अशी कारणे सांगितली जात आहेत. उद्याने, चौपाट्या, मॉल बंद असल्याने अनेकजण घरात कंटाळा आल्यामुळे वाहनांतून केवळ मुंबईभर फिरताना दिसत आहेत. करोना आटोक्यात आणणाऱ्या मुंबई मॉडेलचे सगळीकडे कौतुक होत आहे मात्र निर्बंधांमध्ये शिथिलता मिळताच मुंबईकर करोनाचे नियमच विसरून गेले आहेत. किराणा मालाची दुकाने, पावसाळी साहित्य, हार्डवेअर दुकाने, भाजीपाला- फळ बाजार यामध्ये लोकांची प्रचंड गर्दी दिसत असून करोना नियमांचा पुरता फज्जा उडालेला दिसत आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3g8AhCq
No comments:
Post a Comment