म. टा. प्रतिनिधी, करोनारुग्णांची संख्या घटल्यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून निर्बंध शिथिल झालेल्या ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली या शहरांमध्ये सोमवारपासून निर्बंध पुन्हा कडक करण्यात आले आहेत. त्यामुळे या शहरांमध्ये मॉल, चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे ५० टक्के क्षमतेने उघडण्याची सुरू झालेली प्रक्रिया पुन्हा थांबणार आहे. राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या नव्या सूचनेनुसार ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी या संदर्भातील नवे आदेश जाहीर केले. त्यामध्ये ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीसह संपूर्ण जिल्हा तिसऱ्या गटामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे आठवडाभरापासून मिळालेली मोकळीक पुन्हा बंद होणार असल्याने नागरिकांचा हिरमोड झाला आहे. प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यामुळे रुग्ण बाधित होण्याचा दर व खाटांच्या उपलब्धतेनुसार ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली या तीन शहरांना दुसऱ्या गटामध्ये समाविष्ट करण्यात आले होते. त्यामुळे आवश्यक सेवेतील आणि अन्य दुकाने नियमित उघडण्यास तसेच मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रम, लग्नसमारंभ, सरकारी कार्यालये, खासगी कार्यालयांना मोकळीक मिळाल्याने या शहरांची संपूर्ण अनलॉककडे वाटचाल सुरू झाली होती. गेल्या दोन आठवड्यांपासून ही तीनही शहरे बऱ्याच अंशी खुली झाली होती. परंतु, करोनाच्या नव्या डेल्टा आणि डेल्टा प्लस संकटामुळे शुक्रवारी राज्य शासनाकडून नव्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार ही तीनही शहरे आणि उर्वरित जिल्ह्याचा समावेश पुन्हा तिसऱ्या गटामध्ये करण्याचा निर्णय़ घेतल्याने गेल्या दोन आठवड्यांपासून मिळालेली मोकळीक पुन्हा निर्बंधामध्ये अडकणार आहे. सोमवार, २८ जूनपासून शहरांमध्ये पुन्हा निर्बंध लागू केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई महापालिकांकडून सुधारित आदेश काढण्यात आले आहेत. अत्यावश्यक दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४पर्यंत वैद्यकीय सेवा वगळून अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत खुली ठेवता येणार आहेत. अन्य दुकाने सोमवार ते शुक्रवार याच काळात खुली ठेवता येणार आहेत. आठवड्याअंती ही दुकाने बंद असणार आहेत. मॉल्स, थिएटर, एकल चित्रपटगृऐ, नाट्यगृहे बंद ठेवण्यात येणार आहेत. तर रेस्टॉरंटच्या वेळाही नियंत्रित राहणार आहेत. खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहे. नाराजीचा सूर व्यवसाय सुरळीत होत असल्याने दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झालेल्या व्यावसायिकांना पुन्हा ४ वाजता दुकाने बंद करावी लागणार आहेत. तर मॉल्सकडून करण्यात आलेली जय्यत तयारी निर्बंधामुळे वाया गेली आहे. आत्ता कुठे ग्राहक येण्यास सुरुवात झाला होती परंतु, वेळेचे निर्बंध आल्याने व्यापाऱ्यांची पुन्हा कोंडी झाली आहे, अशी प्रतिक्रिया ठाण्यातील व्यवसायिक संघटनांकडून देण्यात आली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3qrSwaZ
No comments:
Post a Comment