मुंबईकरांची 'नाकाबंदी' म. टा. प्रतिनिधी मुंबई : करोना निर्बंधात अंशत: मोकळीक देत मुंबईतील सर्व दुकाने खुली करण्याचे आदेश मुंबई महापालिकेने दिले. मात्र दुकानातील कामगारांच्या प्रवासाबाबत नेमकी स्पष्टता नसल्याने शहरातील सर्वच रस्त्यांवर अतिप्रचंड दिसून आली. सर्वसामान्यांना रेल्वे-मेट्रोमध्ये बंदी असल्याने रस्त्यांवर मोठी गर्दी उसळली. निर्बंध शिथिल केल्यावर नाकाबंदीवरील वाहन तपासणीबाबत पोलिसांना सरकारकडून कोणत्याही सूचना देण्यात आल्या नाहीत. परिणामी पोलिसांनी नेहमीप्रमाणे वाहन तपासणी सुरू ठेवली. यामुळे मुंबईच्या प्रवेशद्वारांवर म्हणजेच मुलुंड, दहिसर चेकनाका, एरोली टोलनाके येथे वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. मालाड ते दहिसर असा प्रवास करण्यासाठी तब्बल अडीच तास लागले. वाहतूक कोंडीमुळे हा प्रवास अत्यंत त्रासदायक झाला, असे अमोल देशमुख या नागरिकाने ट्वीट केले. 'बोरिवलीवरून अहमदाबाद महामार्गकडे जाण्यासाठी एक तास वाहतूक कोंडीत अडकलो होतो. जागोजागी नाकाबंदी होती. मुळात मर्यादित वेळेत नाकाबंदीतूनही दिलासा देणे आवश्यक होते. निर्बंध उठवताना वाहतूक यंत्रणांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेतल्याने त्याचा फटका लाखो मुंबईकरांना बसत आहे', असे गणेश नरवाल प्रवाशाने केले आहे. करोना नियमावलीनुसार नाकाबंदी जैसे थे असून शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी करण्यात येत होती. वैध कारण असेल तरच शहरात प्रवेश देण्यात येत आहे. त्याचबरोबर विविध विकासकामांमुळे रस्त्यांची रुंदी कमी झाली आहे. यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. दिलासा की लुटीचा मार्ग ? शहरात अत्यावश्यक आणि विना-अत्यावश्यक सेवेतील दुकानांमध्ये राबणारा बहुतांश वर्ग ठाणे, कल्याण, बोरिवली, वसई, विरार, पालघर, बदलापूर, वाशी, पनवेल या ठिकाणी राहतो. मुंबई लोकलमुळे २० ते ३० रुपयांत प्रवासखर्च भागत होता. आता सार्वजनिक वाहतूक नसल्यामुळे दुचाकीने २०० ते ३०० रुपयांचे पेट्रोल लागते. इंधन दर वाढतच असल्याने बंधन उठवल्यामुळे दिलासा मिळाला की लुटीचा नवा मार्ग खुला केला, असा प्रश्न मुंबईकरांकडून उपस्थित होत आहे. आता व्यवहार सुरू होतील लॉकडाउन काळानंतर मर्यादित वेळेत सर्व दुकाने खुली करण्याचे आदेश मुंबई महापालिकेने दिले आहेत. दुकानांची साफसफाई करणे व दैनंदिन व्यवहार सुरू करण्यासाठी कामगारांना पुन्हा कामावर हजर राहण्याचे सांगितले आहे. मात्र लोकल नसल्याने या कामगारांना मुंबईत पोहोचताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. - हिमेश शेट्टी, व्यापारी
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3vIl4yT
No comments:
Post a Comment