: पुणे : कोरोनामुळे एकवर्ष पुढे ढकलली गेलेली टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा विविध कारणांमुळे लक्षात राहिली. भारतासाठीही ही ऑलिम्पिक विशेष ठरली. आतापर्यंत सर्वाधिक पदके घेऊन भारतीय खेळाडू मायदेशी परतणार आहेत. याआधी भारताने 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सहा पदके जिंकली होती. यावेळी भारतानं सुवर्ण कामगिरी करत सात पदके जिंकली आहेत. भारताच्या या कामगिरीत नेमका काय फरक झाला, याबद्दल भारताची माजी अॅथलिट खेळाडू आणि 2003च्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत कांस्य पदक विजेती अंजू बॉबी जॉर्जने तिचे मत मांडले. यावेळी तिने केंद्रातील मोदी सरकारचेही कौतुक केलं आहे. अंजू म्हणाली की, केंद्रातील सरकार खेळाडूंना पाठिंबा देत आहे. खेळाडूंनी चांगली कामगिरी केली किंवा पदक जिंकल्यानंतर पंतप्रधान स्वत: त्यांना फोन करत आहेत. ही गोष्ट वाखाणण्याजोगी आहे. असं पहिल्यांदाच होत आहे. आमच्यावेळी क्रीडामंत्री ऑलिम्पिक व्हिलेजला भेट देत असत. खेळाडूंनी मोठी स्पर्धा जिंकल्यानंतर देशात मोठ्या आनंदाने उत्सव साजरा केला जायचा, पण मंत्रालयाकडून खेळाडूंसाठी कोणतीही मोठी गोष्ट करण्यात आली नाही. पंतप्रधान अभिनंदन करत पण त्यापलीकडे दुसरं काहीच होत नव्हतं. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये पंतप्रधान खेळाडूंना कॉल करत आहेत. त्यांचे अभिनंदन करत आहेत, तसेच त्यांना दिलासाही देत आहेत. देशात काहीतरी मोठी गोष्ट होत आहे. आणि मी ही सर्व संधी मजा गमावली आहे, अशी खंतही या लांब उडीपटूने व्यक्त केली. ऑलिम्पिकमधील क्रीडा मंत्रालय आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे अधिकारी तसेच इतर मंत्र्यांचा सक्रिय सहभाग वाढला आहे. माजी क्रीडामंत्री किरेन रिजिजू हे प्रत्येक खेळाडूची आस्थेनं चौकशी करत आहेत. त्यांच्याकडे सध्या कोणतंही खातं नसताना ते हिरिरीने सहभागी होत आहेत. याबाबतही अंजूला विचारण्यात आलं. त्यावेळी ती म्हणाली, किरेन सर प्रत्येक खेळाडूंना ओळखतात. जेव्हा मी त्यांना मेसेज किंवा फोन करते, तेव्हा ते उपलब्ध असतात. खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी ते कधीही तयार असतात. नुकताच पदभार सांभाळलेले क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनाही क्रीडा क्षेत्राचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनही खेळाडूंना चांगला पाठिंबा अपेक्षित आहे. जर खेळाडूला पाठिंबा दिला तर अशा प्रकारे निकाल दिसू शकेल. देशातील क्रीडा प्राधिकरण 2028, 2030च्या ऑलिम्पिकच्या दृष्टीने काम करत आहे. क्रीडा क्षेत्राशी संबंधित व्यवस्था अशाच प्रकारे असली पाहिजे. खेळाडूंना जोरदार पाठिंबा मिळाला, तर एक दिवस भारत गुणतालिकेत पहिल्या स्थानी दिसेल. असा विश्वासही अंजूने व्यक्त केला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3yA47b0
No comments:
Post a Comment