म. टा. विशेष प्रतिनिधी : लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेले अनेक जण मास्क न लावता बिनधास्तपणे बाहेर फिरताना दिसतात. मात्र लशीची एक वा दोन मात्रा घेतलेल्या असल्या, तरीही डिसेंबर २०२२ पर्यंत मास्क हा वापरायलाच हवा, असे ठाम मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वारंवार वर्तवली जात आहे. रुग्णसंख्येमध्ये पूर्वीपेक्षा वाढ होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारीचा उपाय म्हणून मास्कचा वापर करायला हवा, याकडे वैद्यकीय तज्ज्ञांनी लक्ष वेधले. संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ. विश्वास मोंडे यांनी, संपूर्ण लोकसंख्येच्या ७० टक्के प्रमाणामध्ये लसीकरण व्हायला हवे. आता लसीकरणाचा जो वेग आहे तो पाहता हे उद्दिष्ट गाठणे अवघड दिसते. त्यामुळे ही प्रक्रिया अधिक जलद वाढवायला हवी, असे मत व्यक्त केले. लस घेतल्यानंतर प्रत्येकाच्या शरीरामध्ये प्रतिपिंडे किती संख्येने निर्माण होतील हे वैद्यकीय चाचणी केल्याशिवाय सांगता येणार नाही. लोकसंख्येमध्ये असा मोठा अभ्यासही सध्या झालेला नाही. करोना प्रतिबंधासाठी ज्या डॉक्टरांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात आले होते, त्या वैद्यकीय तज्ज्ञांनीही मास्कचा वापर सातत्याने सुरू ठेवला आहे. 'करोना झाल्यानंतरचा शारीरिक, मानसिक तसेच इतर वेगवेगळ्या पातळ्यांवरचा त्रास सहन करण्यापेक्षा लसीकरणामुळे प्रतिकारशक्ती निर्माण होणे केव्हाही आरोग्यदायी आहे', असे मत संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ. आर. एम. नायर यांनी व्यक्त केले. लसीकरणानंतर संसर्ग होण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे करोना संसर्गाचा प्रादुर्भाव होऊन होणारी अन्य स्वरुपाची गुंतागुंत टळते. लसीकरणानंतरही सौम्य स्वरुपाचा त्रास झालेल्या व्यक्तींचा प्रादुर्भाव लस न घेतलेल्या इतर व्यक्तींना गंभीर स्वरुपाचा ठरू शकतो याकडेही त्यांनी लक्ष वेधले. लाटेचे बदलते स्वरुप करोना संसर्गाच्या लाटेचे स्वरुप आता बदलते आहे. डेल्टा हा परावर्तित स्वरुपाचा विषाणू अधिक जलदरितीने संसर्ग फैलावतो. त्यामुळे लसीकरण झाल्यानंतरही मास्क लावणे अधिक गरजेचे आहे. त्यामुळे संसर्गाचा वेग कमी होण्यास मदत होऊ शकेल, असे राज्याच्या मृत्यूदर समितीचे अभ्यासक डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले. संमिश्र लसीबद्दल चर्चा लसीच्या दोन मात्रा घेतल्यानंतरही पूर्ण स्वरुपामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी ४५ दिवसांचा कालावधी लागू शकतो. लस घेतल्यानंतर संसर्गित व्यक्तींच्या संपर्कात आल्यास लसीकरण झालेल्या व्यक्तीलाही संसर्ग होण्याची शक्यता असते. संमिश्र स्वरुपाची लस घेण्यासंदर्भात अद्याप कोणतीही सुस्पष्टता संबधित यंत्रणांकडून आली नसल्याचे पालिकेच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2WzLx5f
No comments:
Post a Comment