टोकियो : क्रीडा चाहत्यांसाठी शनिवारचा दिवस म्हणजे मेजवानी ठरणार आहे. कारण शनिवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये चाहत्यांना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला पाहायला मिळणार आहे. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 86.65 मीटर थ्रोसह अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे त्याने जर उद्या नेत्रदीपक कामगिरी केली तर त्याला सुवर्णपदकालाही गवसणी घालता येऊ शकते. पण नीरजाला यावेळी कडवी लढत मिळेल ती पाकिस्तानच्या अर्शद नदीमची. त्यामुळे उद्या ऑलिम्पिकमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्वंद्व पाहण्याची सुवर्णसंधी चाहत्यांनी मिळणार आहे. नीरजला पाहून अर्शद क्रिकेट सोडून भालाफेकपटू झाला...नीरजला पाहूनच अर्शद हा भालाफेक या क्रीडा प्रकारात वळल्याचे पाहायला मिळत आहे. कारण पाकिस्तानचा नदीम यापूर्वी क्रिकेट खेळायचा, पण त्याने हा खेळ सोडून अॅथलेटिक्समध्ये नशिब आजमावण्याचा निर्णय घेतला. 2018च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्यानंतर नदीमने सांगितले होते की, नीरजला पाहूनच त्याने भालाफेक खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ज्याच्याकडून प्रेरणा घेऊन अर्शदने भालाफेक खेळायला सुरुवात केली, त्याच नीरजबरोबर उद्या त्याची स्पर्धा रंगणार आहे. त्यामुळे ही लढत चांगलीच चुरशीची होईल, असे म्हटले जात आहे. नीरजने पहिल्याच प्रयत्नात 86.65 मीटर थ्रोसह अंतिम फेरी गाठली. त्याचबरोबर पाकिस्तानच्या नदीमनेही 85.16 मीटर थ्रोसह अंतिम फेरीचे तिकीट काढले. तो ब गटात पहिल्या स्थानी राहिला. पहिल्या प्रयत्नात नदीमने 78.50 मीटर भालाफेक केली होती. दुसऱ्या प्रयत्नावेळी चांगली कामगिरी करताना त्याने 85 मीटरचा आकडा ओलांडला. भालाफेकीत अ आणि ब गटातील 83.50 मीटरची पात्रता पातळी गाठणाऱ्या अव्वल 12 खेळाडूंची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात येत असते. त्यामुळे आता शनिवारी नीरज आणि अर्शद यांच्यामध्ये पदकासाठीची लढत पाहायला मिळणार आहे. ही लढत किती वाजता सुरु होणार, जाणून घ्या...टोकियो ऑलम्पिकमध्ये भालाफेकेची अंतिम फेरी ही भारतीय वेळेनुसार दुपारी ४.३० मिनिटांनी सुरु होणार आहे. त्यामुळे आता या लढतीची उत्सुकता चाहत्यांना लागलेली असेल.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3jwZubG
No comments:
Post a Comment