म. टा. विशेष प्रतिनिधी : अशिलाच्या मदतीसाठी पोलिस ठाण्यात गेल्यानंतर वकिलालाच अर्धा तास बेकायदा डांबून ठेवल्याच्या आरोपप्रकरणात, मुंबई पोलिसांनी मुंबईतील पंतनगर पोलिसांकडून ११ ऑगस्ट रोजी स्पष्टीकरण मागितले आहे. अॅड. प्रदीप गायकवाड यांनी याप्रकरणी पंतनगर पोलिस ठाण्यातील संबंधित पोलिस अधिकाऱ्याच्या वर्तणुकीविषयी सखोल चौकशी करण्याची आणि त्याच्या अहवालानंतर योग्य त्या कारवाईचे निर्देश देण्याची विनंती उच्च न्यायालयाला केली आहे. त्याचबरोबर पाच लाख रुपयांच्या भरपाईची विनंतीही त्यांनी याचिकेद्वारे केली आहे. गायकवाड यांनी अॅड. अनीश जाधव व अॅड. निखिल मानेशिंदे यांच्यामार्फत याविषयी याचिका केली आहे. '१२ मे २०२१ रोजी एका बिल्डर कंपनीचा कर्मचारी माझ्या अशिल नरसम्मा गुडिमला यांच्या घरात बेकायदेशीरपणे घुसला आणि त्याने त्यांना जबरदस्तीने झोपडीबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराविषयी पोलिसांत तक्रार देण्यात आली. तरीही नंतर झोपडपट्टी पूर्णपणे तोडण्यात आली. त्यामुळे याप्रकरणी पंतनगर पोलिस ठाण्यात गुडिमला यांचा मुलगा तक्रार देण्यासाठी गेला. मात्र, पोलिसांनी त्याला दाद दिली नाही. म्हणून मी पोलिसांशी बोलण्यासाठी पोलिस ठाण्यात गेलो. तेव्हा, मी पोलिसांसोबतचे संभाषण रेकॉर्ड करत आहे असे वाटल्याने संबंधित पोलिस अधिकाऱ्याने मला जबरदस्तीने पोलिस कोठडीत डांबले. त्यानंतर माझा सहकारी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना भेटल्यानंतर जवळपास ३५ मिनिटांनी मला कोठडीतून सोडण्यात आले', असा आरोप गायकवाड यांनी आपल्या याचिकेत केला आहे. '१२ मे रोजी पोलिसांनी हा बेकायदा डांबण्याचा प्रकार जाणीवपूर्व केला. जेणेकरून मी व माझ्या अशिलाने बिल्डर कंपनीच्या लोकांविरोधातील तक्रारीचा पाठपुरावा करू नये. या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल मागवण्याचे निर्देश द्यावेत. तसेच संबंधित दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज जपून ठेवण्याचे निर्देशही पंतनगर पोलिस ठाण्याला द्यावेत', अशी विनंतीही गायकवाड यांनी याचिकेत केली आहे. पुढील सुनावणी ११ ऑगस्टला याविषयी न्या. संभाजी शिंदे व न्या. निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठासमोर नुकतीच प्राथमिक सुनावणी झाली. त्यावेळी खंडपीठाने याबाबत सरकारी वकिलांकडे स्पष्टीकरण मागितले. संबंधित पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन सादर करू, अशी ग्वाही सरकारी वकिलांनी दिल्याने खंडपीठाने याविषयीची पुढील सुनावणी ११ ऑगस्टला ठेवली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3AncC9T
No comments:
Post a Comment