Breaking

Friday, August 6, 2021

लोकल कधी रुळावर?; रस्तेमार्गे प्रवासामुळं कर्मचाऱ्यांचे हाल https://ift.tt/3yz3tuv

म. टा. प्रतिनिधी, मुंबईत करोनाची साथ आटोक्यात आली आहे. करोनामुळे गेले दीड वर्ष बंद पडलेल्या अर्थचक्राला गती देण्यासाठी अधिकाधिक क्षेत्रातील कामकाज व व्यवहार सुरू करण्यासाठी पाठबळ देणे गरजेचे आहे. मात्र असे असतानाही सर्वसामान्यांसाठी मुंबईच्या उपनगरी लोकलची सेवा अद्याप खुली झालेली नाही. एकीकडे करोना विषयक निर्बंध काही अंशी शिथील करताना या आठवड्यापासून दुकाने रात्री १० वाजेपर्यंत सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. मात्र लोकलच नसल्याने या दुकानांतील कर्मचारी आपापल्या कामाच्या ठिकाणी पोहचणार तरी कसे, असा प्रश्न व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे. राज्य सरकारने करोनासंबंधी निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे मुंबई व ठाण्यात आता सर्व दुकाने रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा आहे. या निर्णयाबद्दल अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कॅट) राज्य सरकारचे आभार मानले आहेत. पण त्याचवेळी लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी अद्यापही बंद का, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. याबाबत 'कॅट'चे मुंबई महानगर प्रदेशाध्यक्ष शंकरभाई ठक्कर यांनी सांगितले, 'दुकानांच्या वेळा वाढवून दिल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पण कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी पोहचण्यात अडचणी येत आहेत. लोकलसेवा अद्याप सर्वांसाठी सुरू झालेली नाही. त्यामुळे कर्मचारी कामावर पोहचू शकत नाहीत. आतापर्यंत कामाच्या वेळा मर्यादित होत्या. त्यामुळे कर्मचारी संख्या मर्यादित करून केवळ स्थानिकांना कामावर बोलवले जात होते. पण आता दुकानाच्या वेळा वाढल्याने अधिक कर्मचाऱ्यांना कामावर बोलवले जात आहे. पण लोकलमुभा नसल्याने या कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यात अडचणी येत आहेत.' लाखो कर्मचाऱ्यांचा प्रवास जिकिरीचा मुंबई महानगर प्रदेशात जवळपास चार लाख लहान-मोठी दुकाने आहेत. या प्रत्येक दुकानात सरासरी चार ते सहा कर्मचारी काम करतात. इतक्या मोठ्या संख्येने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी पोहचण्यात अडचणी येत आहेत. प्रसंगी त्यांना वेगवेगळ्या वाहनाने अधिक खर्च करून यावे लागत आहे. त्यामुळेच व्यापार क्षेत्रातील रोजगार वाचविण्यासाठी लोकलमुभा सर्वांना देण्याची नितांत गरज असल्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3fDiynk

No comments:

Post a Comment