: राणे यांच्या अटकेच्या निमित्ताने भाजपमधील अंतर्गत राजकारणातही याचे अनेक पडसाद उमटणार आहेत. एकतर राणे यांनी ज्या प्रकारे शिवसेनेला त्यांच्या पद्धतीने अंगावर घेतले, त्यातून भाजपमधील सामान्य कार्यकर्त्याला एक हिरो मिळाला आहे. त्यामुळे भाजपमधील सध्याच्या शीर्षस्थ नेतृत्वाला तत्काळ काही भीती नसली, तरी महाराष्ट्रात शिवसेनेला अंगावर कोण घेते, असा दिल्लीतील नेते विचार करतील, तेव्हा नारायण राणे यांच्याशिवाय दुसरे नाव सध्यातरी त्यांना दिसणार नाही, हे खरे आहे. राणे यांची अटक हा शिवसेनेसाठी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टॉनिक मिळणारा मुद्दा आहे, तसेच त्याचे परिणाम हे भाजपंतर्गतही होणार यात वाद नाही. एकतर सामनामधून असेल, वा सोशल मीडियामधून असेल भाजपचे दिल्लीतील नेते असोत वा राज्यातील फडणवीस, चंद्रकांत पाटील असोत यांच्यावर जी सातत्याने टीका केली जाते, त्याला जशास तसे उत्तर देण्याचे काम आजवर होत नव्हते. राणेंच्या निमित्ताने ते जोरदारपणे सुरू झाले. त्यामुळे भाजपच्या तळाच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याविषयी आपसूकच एक आत्मियता तयार झाली आहे. त्याचवेळी दिल्लीतही त्यांचे वजन या निमित्ताने वाढणार यात वाद नाही. कारण शिवसेनेला मुंबई व महाराष्ट्रात अंगावर घेऊ शकणारा नेता म्हणूनच त्यांच्याकडे आता पाहिले जाणार आहे. मात्र, या सगळ्यात मुंबई महापालिकेवरून भाजपचे लक्ष विचलित झाले आहे, असे देखील भाजपमधील काही ज्येष्ठ नेत्यांना वाटते. मागच्या महापालिका निवडणुकीच्या सहा महिने आधी भाजपने मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावर रान उठवले होते. आज महापालिका निवडणुकीला सहा महिने उरले असताना, भाजप कुठल्या कार्यक्रमात वेळ घालवते आहे, तर सेना भवनावर हल्ला करून ते उद्धव ठाकरे व कुटुंबीयांवर राणे कुटुंबीयांकडून होणारी वैयक्तिक टीका यात. त्याचवेळी राणेंच्या निमित्ताने सामान्य शिवसैनिकाला मात्र उद्धव यांनी चार्ज केले आहे. दुसरीकडे सन २०१४मध्ये उद्धव यांनी अफजल खानाच्या फौजा महाराष्ट्रात उतरत आहेत, अशी टीका केली, तेव्हा मोदी आणि शहा यांनी ठाकरे व विशेषतः बाळासाहेब ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका करण्याचे टाळले होते. मूळ मुद्द्यापासून जनतेचे लक्ष विचलित न करण्याची त्यांची ही रणनिती यशस्वी झाली होती. महाराष्ट्र भाजपचे सध्याचे नेतृत्व यावेळी मात्र त्यात यशस्वी झाले नाही. ते उद्धव यांच्या राजकीय जाळ्यात गुंतल्यासारखी परिस्थिती दिसते आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, राणे यांच्या अटकेच्या निमित्ताने राज्यभरात जी वेगवेगळी निदर्शने झाली, त्यात सर्वात मोठे हिरो हे वरुण सरदेसाई ठरले आहेत. सरदेसाई हे तरुण असले, तरी शिवसेनेंतर्गत त्यांच्याविषयी अनेक मतमतांतरे आहेत. त्याचा परिणाम शिवसेनांतर्गतही काही प्रमाणात होणार व त्याचा फायदा भाजप घेण्याचा प्रयत्न करेल. मात्र, या सगळ्यात मोठी गोम ही आहे की, राणे यांची आक्रमकता पाहता येणाऱ्या काळात या घटनेचे पडसाद नक्की कसे उमटतील हे कुणालाच सांगता येणार नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था असोत वा इतर निवडणुका या कोणत्या दिशेने जातील हे सांगणे कठीण आहे, असेच भाजपमधील ज्येष्ठांचे म्हणणे आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3kmcAJ7
No comments:
Post a Comment