नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथ्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून (२ सप्टेंबर) सुरवात झाली. नाणेफेक जिंकत इंग्लंडचा कर्णधार जो रुटनं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ओवलच्या मैदानावर भारताला पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. भारताची आघाडीची फळी लवकर तंबूत परतल्याने अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाला फलंदाजी करण्यासाठी बढती देण्यात आली. त्यावरून अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. रहाणे आणि पंत यांच्या अगोदर जडेजाला खेळण्यासाठी पाठविण्यामागे नेमकं काय कारण होतं याचा प्रत्येकजण आपापल्या परीनं अंदाज बांधतो आहे. भारतीय संघाचा तडाखेबंद माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने या प्रकरणी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. जडेजाला फक्त एकदा प्रयत्न करण्यासाठी पाठवलं गेलं असं वाटत नाही. संघ व्यवस्थापन त्याला वरच्या क्रमांकावर खेळविण्याचा विचार पुन्हा करणार नाही, असं सेहवागनं म्हटलं आहे. रवींद्र जडेजा ओवल कसोटी सामन्यात उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत यांच्या अगोदर फलंदाजीसाठी मैदानात आला आणि हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. त्यानं कर्णधार विराट कोहलीसोबत ३० धावांची भागीदारी केली. पण, त्याला ३४ चेंडूत फक्त १० धावा करता आल्या. उजव्या आणि डाव्या हाताच्या फलंदाजांची जोडी लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला असावा, असे सेहवागला वाटते. हिंदुस्तान टाइम्सच्या बातमीनुसार, सेहवाग म्हणाला की, कदाचित हा निर्णय इंग्लंडच्या गोलंदाजांची लय बिघडवण्यासाठी घेण्यात आला असेल. याशिवाय जर काही कारण असेल, तर ते भारतासाठी चांगलं लक्षण नाही. कदाचित एखाद्या सामन्यांसाठी हा बदल केला गेला असेल. परिस्थिती स्विंग गोलंदाजांसाठी अनुकूल आहे आणि उजव्या हाताच्या फलंदाजांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जडेजाला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. उजव्या आणि डाव्या हाताची जोडी नेहमी गोलंदाजांना त्रास देते. याआधी शार्दुल ठाकूरनेही तेच सांगितले होते की, उजव्या आणि डाव्या हाताच्या जोडीमुळे जडेजाला प्रथम फलंदाजीसाठी पाठवण्यात आले होते. शार्दूल म्हणाला होता की, जडेजा आणि रिषभ पंत यांच्यापैकी कुणाला वरच्या फळीत खेळायला पाठवावे, याबद्दल प्रत्येकजण बराच वेळ बोलत होता. दोघेही मॅच विनर असल्याने काही फरक पडत नाही. अनेक प्रसंगी जडेजाने संघासाठी महत्त्वपूर्ण धावा केल्या आहेत. पहिल्या कसोटी आणि लॉर्ड्समध्ये त्याची फलंदाजी पाहिली, तर तो खेळपट्टीवर टिकून राहण्याचा प्रयत्न करत होता. डाव्या-उजव्या हाताच्या जोडीमुळे त्याला फलंदाजीसाठी प्रोत्साहन दिले गेले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3BFZ7TG
No comments:
Post a Comment