म. टा. विशेष प्रतिनिधी, व प्राणिसंग्रहालयातील पेंग्विनच्या देखभालीसाठी १५ कोटींची निविदा मागवल्यानंतर सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून बुधवारी देखभालीची निविदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्याच दिवशी रात्री आधीचा निर्णय बदलून, निविदा रद्द न करता देखभाल खर्च कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, निविदा रद्द करण्याच्या आधीच्या निर्णयाला पालिकेचे अधिकारी आणि काँग्रेस व भाजपनेही दुजोरा दिला होता. पेंग्विनची पुढील तीन वर्षांची देखभाल व आरोग्य व्यवस्थापन यासाठीच्या निविदेवरून गेले काही दिवस आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. या वादानंतर बुधवारी पालिकेने ही निविदा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भात 'महाराष्ट्र टाइम्स'ने संबंधित पालिका अधिकाऱ्यांकडून खातरजमा केली होती. पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा, भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनीही निविदा रद्द करण्यात आल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली होती. दरम्यान महापालिकेने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, 'पेंग्विन कक्षासाठी वैद्यकीय अधिकारी नेमण्यास नुकतीच मंजुरी प्राप्त झाली आहे. त्यामुळे हा खर्च निविदेतून आपोआप कमी होणार आहे. अशा आणखीही उपाययोजना करण्यात येत आहेत व त्यादृष्टीने निविदेममध्येे फेरबदल करण्यात येणार आहेत. निविदा मागे घेण्याचा किंवा रद्द करण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही. पेंग्विन कक्षामुळे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे पर्यायाने प्रशासनाच्या उत्पन्ात भरीव वाढ झाली आहे. पेंग्विन कक्ष उभारणीआधी ३ वर्षांच्या कालावधीत वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे उत्पन्न २ कोटी १० लाख इतके होते. तर पेंग्विन कक्ष उभारणीनंतर एप्रिल २०१७ ते मार्च २०२० या कालावधीत ते १४ कोटी ३६ लाख रूपये इतके झाले. त्याशिवाय पेंग्विन कक्षामुळे प्राणिसंग्रहालयात आलेल्या पर्यटकांमुळे वाहनतळ, उपहारगृह आदींच्या माध्यमातून उत्पन्नात भर पडली आहे. यामुळे या कक्षाची योग्य व नियमित देखभाल करून, त्याच्या खर्चात काटकसर करून, उत्पन्न वाढविण्यावर पालिका प्रशासनाचा भर आहे', असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/38X2bOE
No comments:
Post a Comment