म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मनी लाँडरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) वारंवार बजावलेल्या समन्सविरोधात यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला असला तरी एका कायदेशीर मुद्द्यामुळे गुरुवारी त्याविषयी सुनावणी होऊ शकली नाही. नियमाप्रमाणे या अर्जावर द्विसदस्यीय खंडपीठासमोर की एकल न्यायाधीश खंडपीठासमोर सुनावणी होणे आवश्यक आहे, हा मुद्दा प्रथम निकाली काढू, असे म्हणत त्याविषयी १४ सप्टेंबरला निर्णय देणार असल्याचे न्या. संदीप शिंदे यांनी स्पष्ट केले. 'देशमुख यांचा अर्ज एकल न्यायाधीशांसमोर सुनावणीस ठेवला जाऊ शकतो का, असा प्रश्न उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीनेच उपस्थित केला आहे. कायदेशीरदृष्ट्या दोन न्यायाधीशांचा समावेश असलेल्या खंडपीठाकडून ज्या विषयावर निर्णय होऊ शकतो, त्यावर कदाचित एकल न्यायाधीशांकडून होऊ शकत नाही; मात्र एकल न्यायाधीशांच्या अखत्यारीतील विषयावर खंडपीठालाही निर्णय देता येऊ शकतो. त्यामुळे प्रथम हा कायदेशीर मुद्दा निकाली निघायला हवा', असे म्हणणे ईडीतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मांडले. मात्र, त्याला देशमुख यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील विक्रम चौधरी व अॅड. अनिकेत निकम तीव्र विरोध केला. 'एफआयआर, आरोपपत्र किंवा फौजदारी दंड संहितेच्या कलम १५६(३) अन्वये झालेला तपासाचा आदेश हे रद्द करण्याच्या मागणीचे अर्ज आणि अनुच्छेद २२६ व २२७खालील याचिका द्विसदस्यीय खंडपीठासमोर जातात. देशमुख यांचा अर्ज या गटात मोडत नाही. त्यांनी फौजदारी दंड संहितेच्या कलम ४८२खाली अर्ज केला असल्याने एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाला सुनावणीचा निश्चितच अधिकार आहे', असा युक्तिवाद निकम यांनी मांडला. त्याचवेळी 'ईडी या प्रकरणात जाणीवपूर्वक सनसनाटी निर्माण करत आहे. विशिष्ट प्रकारची कागदपत्रे व माहिती उघड केली जात आहे. देशमुख यांचे अर्ज न्यायालयात प्रलंबित असताना आणि त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशीला हजर राहण्याची तयारी दर्शवली असतानाही ईडीने वारंवार समन्स बजावले आणि आता लुकआऊट नोटीसही काढली', असे चौधरी यांनी निदर्शनास आणले. सीबीआयने एफआयआर नोंदवल्यानंतर ईडीनेही देशमुख यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. 'देशमुख यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेच्या माध्यमातून मुंबईतील रेस्टॉरंट अँड बारकडून चार कोटी ७० लाख रुपये गोळा केले आणि ही रक्कम त्यांच्या कुटुंबाचे नियंत्रण असलेल्या नागपूरस्थित श्री साई शिक्षण संस्थेत वळते केले', असा ईडीचा आरोप आहे. मात्र, देशमुख यांनी या आरोपांचे खंडन केले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3k0trlY
No comments:
Post a Comment