म. टा. प्रतिनिधी, राज्यात शाळा आणि धार्मिक स्थळे खुली होणार असल्याने विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक हा एसटीचा मोठा प्रवासी वर्ग पुन्हा महामंडळाकडे वळणार आहे. मात्र नव्या गाड्यांची कमतरता, आर्युमान पूर्ण झालेल्या गाड्या, अपुऱ्या शिवशाही यांसह प्रवासी वाहतूक करण्याचे मोठे आव्हान राज्य परिवहन (एसटी) महामंडळासमोर असल्याने येत्या काही दिवसांत 'प्रवासी आहेत पण कुठे आहे ?', असे विचारण्याची वेळ प्रवाशांवर येण्याची शक्यता आहे. वडाप, खासगी बस अशा असुरक्षित प्रवासी वाहतुकीला पोषक सरकारी धोरण, कंत्राटदारांना पूरक महामंडळाच्या योजना, खर्चिक महाविद्यालय-रुग्णालय प्रकल्पांचा आग्रह यामुळे गेल्या काही काळात महामंडळाची आर्थिक स्थिती रसातळाला गेली. करोनाच्या दोन्ही लाटेत महामंडळाला कर्मचाऱ्यांना पगार देणे ही अवघड झाले होते. त्यामुळे विद्यार्थी-ज्येष्ठांचा प्रवास असुरक्षित वाहतूकसेवेतून होणार का, असा प्रश्न निर्माण होत आहे. करोनापूर्व काळात विद्यार्थी, ज्येष्ठ या सवलतधारकांची संख्या अंदाजे एकूण ३० लाखांच्या घरात आहे. जानेवारी २०२०मध्ये महामंडळाच्या ताफ्यात १८ हजार, ५०० गाड्या होत्या. सध्या महामंडळाच्या ताफ्यात अडीच हजार कमी अर्थात १६ हजार गाड्या आहेत. यापैकी केवळ १० हजार गाड्या राज्यात धावत आहेत. उर्वरित ५ हजार गाड्यांपैकी अडीच हजार गाड्यांचे आयुर्मान पूर्ण झाले आहे. उर्वरित अडीच हजार गाड्या लांब पल्ल्यांसाठी योग्य ठरू शकतील का ? हे गाड्या प्रत्यक्ष रस्त्यांवर आल्यानंतरच समजू शकणार आहे. आपत्कालीन स्थिती आणि अन्य कारणांसाठी कार्यशाळा, आगार आणि बस स्थानक येथे एक हजार गाड्या आहेत, असे एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. करोनापूर्व काळात महामंडळ रोज ६० लाख प्रवाशांची वाहतूक करत होते. आता हा आकडा २५-२६ लाखांपर्यंत आला आहे. शाळा, तीर्थायात्रा-जत्रा, उत्सव सुरू झाल्यानंतर प्रवासी सेवेसाठी जादा गाड्यांची आवश्यकता भासणार आहे. दरम्यान महाकार्गोसाठी प्रवासी सेवेतीलच १,१८० गाड्यांचे मालवाहू ट्रकमध्ये रूपांतर करण्यात आले असून हा आकडा २ हजारपर्यंत नेण्याचे नियोजन महामंडळाचे आहे. नव्या एसटींसाठी सहा महिने एसटी महामंडळ स्वमालकीच्या ७०० आणि भाडेतत्त्वावर ५०० गाड्या घेणार आहे. सध्या या गाड्यांसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. प्रक्रियेअंती बस बांधणी होऊन प्रवासी सेवेत दाखल होण्यासाठी किमान सहा महिन्यांचा काळ अपेक्षित आहे. या बाराशे गाड्या आल्यानंतरही पाच हजार गाड्यांची कमतरता भरून निघणे शक्य नाही.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3AKpl7t
No comments:
Post a Comment