कडुनिंबाच्या फांदीवर बसलेल्या एका कावळ्याने काव काव करत दुसऱ्याला आवाज दिला, तरी त्याच्याकडून काही प्रतिसाद मिळाला नाही. काही सेकंद वाट पाहून त्याने पुन्हा एकदा काव काव केले. त्यानंतर काही सेकंदांनी दुसरा पंख फडफडवत आला आणि त्याच्या बाजूच्या फांदीवर बसला. पहिला जरा नाराजीनेच म्हणाला, 'मघापासनं काव काव करतोय मी, घसा सुकून गेला माझा, तुझा काही पत्ताच नाही यार.' फांदीवर नीट विसावत दुसरा म्हणाला, 'अरे विश्वदर्शन सोसायटीत बी- २९मध्ये आज पाहुणे येणार आहेत, त्यांच्या खिडकीवर जाऊन काव काव करून आलो. पहिल्यांदा काव काव केलं, तेव्हा बहुधा कोणाला ऐकायलाच नाही गेलं, म्हणून मी थांबून राहिलो. काही वेळानं पुन्हा काव काव केलं, तेव्हा घरातली बाई म्हणाली, 'कावळा ओरडतोय, पाहुणे येणार वाटतं आज.' तिचा नवरा म्हणाला, 'बकवास आहे हे, असं काही नसतं.' ते ऐकल्यावर मी उडून इकडे आलो. कुणाचा विश्वास असो नसो, आपण आपलं काम चोख केलं पाहिजे.' पहिला कावळा फांदीवर चोच मारत म्हणाला, 'बरं झालं उडून आलास ते. आपण सावध करण्यासाठी वर्दी देतो, त्याची यांना किंमत नसते; पण मी कशासाठी काव काव करत होतो ते विचारलंच नाहीस तू.' चोच पंखात खुपसून खाजवत दुसऱ्या कावळ्याने विचारले, 'बोल, एवढं काय विशेष होतं काव काव करण्यासारखं? रोजचीच तर सकाळ आहे. काहीच वेगळं नाही. घराघरांत माणसं उठली, आपापले मोबाइल चेक केले, गुड मॉर्निंगचे मेसेज फॉरवर्ड करून मोबाइल चार्जिंगला लावले. तोंडात ब्रश धरून पुरुष खिडकीशी उभे राहिले. बायका चहा टाकायला किचनमध्ये गेल्या. रात्री उशीरापर्यंत ओटीटीवर असलेली पोरं टोरं अजून लोळत आहेत. सगळं तेच ते आणि तेच ते तर आहे.' वैतागून पहिला कावळा म्हणाला, 'बाप रे, माझ्या एका प्रश्नावर केवढं रामायण लावलंस तू. मी तर तुला फक्त शुभेच्छा द्यायला काव काव करत होतो.' ते ऐकल्यावर दुसरा थोडा नरमला आणि म्हणाला, 'सॉरी यार, अरे एकच एक एपिसोड रोज रोज पाहून कंटाळा आला, म्हणून वैतागलो थोडा. असं वाटतं वेगवेगळ्या चेहऱ्यांची; पण एकसारखीच माणसं सगळ्या घरांत राहतात. व्हरायटी संपून चाललेली आहे. कधी कधी तर वाटतं, खेड्यात जाऊन छान काव काव करत उरलेलं आयुष्य घालवावं.' त्याचे ऐकून पहिला कावळा चोचीतल्या चोचीत हसला आणि म्हणाला, 'खेड्यात जायचं म्हणतोस? मी असाच कंटाळून एकदा खेड्यात गेलो होतो, छान एका नदीकाठच्या झाडावर वस्ती केली होती. सकाळी पाहतो तर काय, नदीच्या काठानं एका रांगेत टमरेलं घेऊन बसलेले आठ-दहा जण सगळेच्या सगळे कर्म करता करता मोबाइलवर काही तरी बघत होते. एके काळी तिथं बसून लोक गप्पा मारायचे, गावभरच्या खबरा मला झाडावर बसल्या बसल्या मिळायच्या.' 'म्हणजे सगळीकडे हीच अवस्था आहे तर. बरं बोल, शुभेच्छा कसल्या देणार होतास मला?' दुसऱ्याने गाडी मूळ पदावर आणली. पहिला म्हणाला, ' सुरू होतोय, त्याच्या तुला शुभेच्छा. आता पंधरा दिवस आपली मजा आहे. कोणी खिडकीवरून हाकलणार नाही, आपल्या काव कावला वैतागणार नाही.' दुसरा म्हणाला, 'तुलाही शुभेच्छा; पण यार, ती तांदळाची खीर खाऊन खाऊन कंटाळा येतो. बरं या लोकांचे पितर येतात तेही कंटाळतात, तरी खातात बिचारे. गेल्या वर्षी त्या चंद्रवदन सोसायटीतल्या ४०३ नंबरवाल्याचा पितर आला होता. मी तांदळाच्या खिरीवर चोच मारत होतो, तर तो पितर मला म्हणाला, 'अरे मला हेवी डायबेटीस आहे ते विसरलेत की काय हे लोक? केवढी साखर घातली आहे खिरीमध्ये?' टाळीसाठी आपला काटकुळा पाय पुढे करत पहिला म्हणाला, 'माझी गंमत ऐक. गेल्या वर्षी एका बाईनं कोहळ्याच्या भाजीत मीठ घातलं नव्हतं, तर तिचा पितर एवढा चिडला, की मला म्हणाला, 'माझं मृत्यूपत्र कुठं ठेवलं आहे ते सांगतो, तू चोचीत धरून आण आणि खाडीत दे फेकून.' 'आमचं ते काम नाही. ठरल्यानुसार आम्ही फक्त तुम्हाला तुमच्या घरच्यांनी ठेवलेलं अन्न खाऊ घालू शकतो,' असं सांगून त्याला कसंबसं शांत केलं मी.' 'अरे काय गमतीजमती सांगू तुला,' म्हणत दुसऱ्याने आणखी एक किस्सा सागितला, 'एक पितर मला म्हणाला होता, मला माझ्या घरच्यांनी ठेवलेलं खाण्यात काहीही इंटरेस्ट नाही. किमान मी गेल्यावर तरी सुधारले, की अजून तसेच आहेत, एवढंच पहायचं होतं, तेवढ्यासाठीच आलोय मी.' त्याला मी म्हणालो, 'तुम्ही खाणार असाल तरच माझ्यात राहा, नाही तर सोडा मला. बरेच पितर रांगेत आहेत अजून,' मग तो चुपचाप जेवला.' 'पण असो, संध्याकाळी आपल्या एरियातल्या कावळ्यांची मीटिंग घेऊ आणि सोसायट्या वाटून घेऊ. एखाद्या कुटुंबानं घास ठेवला आणि पितर उपाशीच गेलं, असं नको व्हायला,' पहिल्या कावळ्याने कर्तव्याची आठवण करून दिली. 'आणि हो, काही कावळ्यांना पाहुण्यांची वर्दी देण्यासाठी मोकळं ठेवलं पाहिजे, काहींना आपल्या घरट्यांवर लक्ष ठेवायला सांगितलं पाहिजे. नाही तर कोकिळा आपल्या घरट्यात अंडी घालायला टपलेलीच असते,' दुसऱ्याने नेहमीच्या व्यवहाराची आठवण करून दिली. 'ओके, चल भेटू संध्याकाळी मीटिंगला. काव काव...' 'ठीक आहे, आजची कामं करू या ठरल्याप्रमाणे. काव काव...' आणि दोघे दोन दिशांना उडाले... - तंबी दुराई
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/39Dqhyr
No comments:
Post a Comment