Breaking

Monday, September 6, 2021

मुंबई, ठाण्यात पावसाचा जोर वाढणार; कोकणात अतिवृष्टीचा इशारा https://ift.tt/3yP86Qv

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः मुंबईमध्ये सोमवारी दिवसभरात रिमझिम पाऊस असला तरी मंगळवारपासून जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्यभरात विविध ठिकाणी गुरुवारपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर पावसाचा जोर कमी होऊन बाप्पाच्या आगमनावेळी मध्यम सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईमध्ये मंगळवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मात्र पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, कोल्हापूर तसेच सातारा या जिल्ह्यांमधील घाट परिसर, सांगली, सोलापूर, मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड येथे ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा आहे. विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकेल. या कमी दाबाच्या क्षेत्राचा सर्वाधिक प्रभाव उत्तर कोकणात असेल. मुंबई, पालघर, ठाणे येथे बुधवारी अतिवृष्टीची शक्यता आहे. पालघरमध्ये गुरुवारीही याचा प्रभाव जाणवू शकेल. धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक या पट्ट्यात गुरुवारपर्यंत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे. विदर्भाच्या गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यांमध्ये तसेच पालघर येथे शुक्रवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस असेल. मात्र उर्वरित महाराष्ट्रासाठी कोणताही इशारा नाही. बहुतांश ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे. गुजरातमध्ये ८ आणि ९ सप्टेंबरला तुरळक ठिकाणी तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस असल्याने राज्यातील लगतच्या जिल्ह्यांवर काही प्रमाणात प्रभाव असू शकेल. बंगालच्या उपसागरामध्ये दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेश यांच्या किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. यामुळे या आठवड्यात राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रवास पश्चिम आणि वायव्य दिशेकडे होत आहे. त्यामुळे त्याचा विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणावर टप्प्याटप्प्याने प्रभाव जाणवेल. - शुभांगी भुते, प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/38KW6EZ

No comments:

Post a Comment