पालकमंत्र्यांचा दावा : येत्या तीन दिवसांत कडक निर्बंध म.टा. प्रतिनिधी, नागपूरः नागपुरातील करोनाबाधितांची दैनंदिन संख्या आता एकेरीवरून दुहेरी आली. ती दिवसेंदिवस वाढत असल्याने हा तिसऱ्या लाटेचा धोका आहे, असे सांगत येत्या दोन ते तीन दिवसांत नागपुरात पुन्हा कडक निर्बंध लावण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. हा सणांचा काळ असल्याने गर्दीही वाढू लागली आहे. ती नियंत्रित केली नाही तर करोनाचे भीषण संकट पुन्हा उभे राहील, अशी चिंता विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवारी आयोजित आढावा बैठकीत तज्ज्ञांनी व्यक्त केली. यावेळी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी आर. विमला, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अतिरिक्त पोलिस आयुक्त अस्वती दोरजे, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, मेयोच्या अधिष्ठाता डॉ. भावना सोनवणे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, आएमएचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर व कोव्हिड टास्क फोर्सचे प्रतिनिधी उपस्थित होते. पुढील दोन-तीन दिवसांत व्यापारी, उद्योजक व अनुषंगिक घटकांच्या बैठकी घेऊन नागपूर जिल्ह्यात कडक करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात येणार आहे. आरोग्ययंत्रणा सज्ज बैठकीत कोव्हिडसह डेंग्यूचाही आढावा घेण्यात आला. सध्या शहरात डेंग्यूची रुग्णवाढ होत असून त्याचे विश्लेषण वैद्यकीय तज्ज्ञांकडून केले गेले. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेवून सध्या मेडिकलमध्ये दोनशे खाटा कोव्हिडसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ऑक्सिजनची मुबलक उपलब्धता जिल्ह्यात आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्तरापर्यंत ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटरची उपलब्धता करण्यात आली आहे, असा आढावा विविध विभागांमार्फत सादर करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी उत्सव, सण, कार्यक्रमांमध्ये होणारी गर्दी नियंत्रित करणे अत्यावश्यक असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. जिल्ह्यात आढळलेल्या ७८ पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आले आहेत. दुकाने दुपारी चारपर्यंतच सध्या रात्री दहापर्यंत हॉटेले सुरू आहेत. यात बदल करून रेस्टॉरंट रात्री दहाऐवजी आठ वाजेपर्यंत सुरू राहतील. इतर दुकाने रात्री आठऐवजी दुपारी चारपर्यंत सुरू राहतील. यासह इतर निर्बंधांबाबतही येत्या तीन दिवसांत निर्णय घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले. नागरिकांनी मास्क घालणे, सुरक्षित वावर पाळणे, गर्दी टाळणे आवश्यक असल्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. दोन डोस घेऊनही पॉझिटिव्ह सोमवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या १२ रुग्णांमध्ये पाच वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. पाच रुग्णांनी लशींचे दोन डोस घेतले होते. एक डोस घेतलेल्यांची संख्या चार आहे. यातील चौघांना एम्समध्ये, एकाला खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. आमदार निवासमध्ये सहा रुग्ण असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3jNw0ra
No comments:
Post a Comment