लखनऊः लखीमपूर खिरीतील हिंसाचाराच्या घटनेवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( ) यांनी प्रथमच आपली प्रतिक्रिया दिली आहे. सरकार कोणालाही पाठीशी घालत नाहीए. सरकारकडे कोणत्याही घटनेचे तथ्य असेल तर सरकार काम करेल, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. डीडी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शेतकर्यांच्या आंदोलन ते सरकारविरोधातील नकारात्मकतेच्या मुद्द्यांवर भाष्य केले. लखीमपूर खिरी घटनेत केंद्री गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र आशिष मिश्रा यांना सरकार संरक्षण देतंय का? असा सवाल त्यांना विचारला गेला. सरकारने नियमानुसार जी काही कारवाई केली, ती झाली आहे. पुढील काळात जी काही चौकशी करायची असेल, ती आम्ही करू. आता हायकोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी सुरू आहे, असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. शेतकरी आंदोलनावर योगी म्हणाले... शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणी काम केले असेल, तर ते पंतप्रधान मोदींनी केले आहे. आमच्या सरकारचे पहिले पाऊल कर्जमाफी होते. आम्ही सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या केल्या होत्या. तेव्हा कुठेही शेतकऱ्यांची आंदोलनं झाली नाहीत. तेव्हा हे शेतकरी कुठेच होते? आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. शेतकऱ्यांकडून थेट पीक खरेदी करण्यास आम्ही सुरवात केली आहे, असं शेतकरी आंदोलनावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. शेतकऱ्यांच्या हितासाठी आमच्या सरकारने काम केले. करोना संसर्गाच्या काळातही आम्ही साखर कारखानाने सुरू ठेवले. ऊस खरेदीत कोणतीही अडचण येऊ नये म्हणून आम्ही काम केले. मागील सरकारने शेतकऱ्यांचे पैसे का दिले नाहीत. आमच्या सरकारने नवीन साखर कारखाना सुरू केला. सपा आणि बसपाच्या काळात साखर कारखाने बंद केले होते. भाषण देणे वेगळे, शेतकर्यासाठी काम करणे वेगळे, असा टोला योगींनी विरोधकांना लगावला. आगामी निवडणुकीतील विजयाबद्दल बोलले... पुढील वर्षाच्या सुरवातीला उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या वातावरणात मुख्यमंत्री योगींची ही मुलाखत आली आहे. लोकशाहीत जनतेचा निर्णय सर्वोच्च असतो. सरकारविरोधात कुठली लाट आहे, असं वाटत नाही. राज्यात विकास, कायदा सुव्यवस्थेवर खूप काम झाले आहे. जनता बोलत नाहीत, फक्त निर्णय घेते. पुढचे सरकार भाजपच्या नेतृत्वातच स्थापन होईल, असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3BlfZhI
No comments:
Post a Comment