आबुधाबी : ऋतुराजच्या अफलातून शतकाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने प्रथम फलंदाजी करताना १८९ धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करत असताना राजस्थानच्या संघातील यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे या दोन्ही मुंबईकरांनी धडाकेबाज फलंदाजी करत संघाला सात विकेट्स राखून विजय मिळवून दिला. मुंबईकर शिवम दुबेने यावेळी ४२ चेंडूंत चार चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद ६४ धावांची खेळी साकारली, तर दुसरा मुंबईकर यशस्वी जैस्वालने यावेळी तडाखेबंद अर्धशतक पूर्ण केले. राजस्थानला यावेळी चेन्नईच्या आव्हानाचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वालने धडाकेबाज सुरुवात करून दिली. यशस्वीने यावेळी फक्त २१ चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५० धावांची खेळी साकारली. यशस्वीला यावेळी चेन्नईचा वेगवान गोलंदाज आसिफने बाद करत चेन्नईला मोठे यश मिळवून दिले. यशस्वी बाद झाला असला तरी त्यानंतर शिवम दुबेने चेन्नईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतल्याचे पाहायला मिळाले. शिवमला यावेळी राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनची चांगली साथ मिळाली. संजूला मोक्याच्या क्षणी शार्दुल ठाकूरने बाद केले आणि चेन्नईला यश मिळवून दिले, त्याला यावेळी २८ धावा करता आल्या. पण शिवम दुबेने संजू बाद झाल्यावरही दमदार फलंदाजी सुरुवात ठेवली. चेन्नईच्या संघाने प्रथम फलंदाज करताना चांगली सुरुवात केली होती. ऋतुराज आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी यावेळी ४७ धावांची सलामी दिली होती. राहुल तेवातियाने फॅफला २५ धावांवर बाद करत ही जोडी फोडली. आजच्या चेन्नईच्या फलंदाजीचे वैशिष्ठ ठरले ते ऋतुराजचे शतक. कारण आतापर्यंत या मोसमात चेन्नईच्या एकाही फलंदाजाला शतक झळकावता आले नव्हते, पण ही गोष्ट ऋतुराजने आज साकारली. ऋतुराजने राजस्थानच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला आणि धडेकाबाज फटकेबाजी करत जलदगतीने धावा समवल्या. ऋतुराज आज शतक झळकावणार की नाही, याबाबत सर्वांच्या मनात उत्सुकता होती. पण ऋतुराजने डावाच्या अखेरच्या चेंडूवर षटकार लगावला आणि आयपीएलमधले आपले पहिले शतक पूर्ण केले. यापूर्वी ऋतुराजने नाबाद ८८ धावांची खेळी साकारली होती. पण ऋतुराजने आज आपले शतक पूर्ण केले. ऋतुराजने यावेळी ६० चेंडूंत ९ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर नाबाद १०१ धावांची खेळी साकारली. ऋतुराजच्या या नाबाद शतकाच्या जोरावर चेन्नईला राजस्थानपुढे १९० धावांचे आव्हान ठेवता आले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3l1D4Ba
No comments:
Post a Comment