म.टा. विशेष प्रतिनिधी, केवळ शारीरिक मारहाण हीच हिंसा नव्हे, तर शाब्दिक, लैंगिक, भावनिक अशा वेगवेगळ्या स्तरांवर घरगुती हिंसाचारामध्ये महिलांचे दमन केले जाते. ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये हिंसा करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असल्या, तरीही या प्रकारास '' म्हणतात. याचे आकलन शहरी व ग्रामीण भागांमध्ये आजही वेगवेगळे असल्याचे विविध प्रकारच्या अनुभवांतून पुढे आले आहे. 'कोरो' सामाजिक संस्थेतर्फे राज्यातील ११ हजार २०० घरांमध्ये या विषयाला धरून सर्वेक्षण करण्यात आले होते. यात मुंबई, नगर तसेच नाशिक या जिल्ह्यांचा समावेश होता. हिंसेकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन यातून स्पष्ट झाला. ही हिंसा केवळ शारीरिक मारहाणीच्या स्वरूपातील नसून शाब्दिक, मानसिक, भावनिक, लैंगिक पातळीवर करण्यात येणारा छळ हा हिंसेचाच प्रकार असल्याची जाणीवजागृती आता होत आहे. मुलांसमोर मारहाण करणे, शिवीगाळ करणे, मुलांसोबतचे संबंध तोडणे याचाही समावेश हिंसेच्या स्वरूपात होतो, हेदेखील आता पीडित महिलांना समजू लागले आहे. या सर्वेक्षणात दहा टक्के महिलांसोबत अधिक सखोल चर्चा केल्यानंतर त्यांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपातील हिंसेचा सामना करावा लागल्याचा अनुभव सांगितला. या अन्यायाविरोधात लढण्यासाठी मैत्रिणी, माहेरचे कुटुंबीय, महिला मंडळाचा आधार वाटतो असेही त्यांनी स्पष्ट केले होते. लैंगिक छळाबद्दल वाच्यता कमी शारीरिक मारहाणीबद्दल पुढे येऊन बोलणाऱ्या महिला लैंगिक छळाबद्दल सांगत नाहीत. वैद्यकीय तपासणी होईपर्यंत त्यांचे या पातळीवरही शोषण झालेले असते याची कल्पना येत नसल्याचे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मंजिरी आशा दीपक सांगतात. शहरांमधील पीडित महिला याबद्दल बोलत्या झाल्या असल्या, तरीही ग्रामीण भागात नवरा आहे, तो मारणारच ही मानसिकता गडद आहे. लैंगिक संबंधांमधील जोरजबरदस्ती, कपडे कोणते घालावे यासाठी असलेला आग्रह, पुरुषांसोबत संवाद ठेवण्याचा निर्णय अशा वेगवेगळ्या प्रकारची हिंसेची अदृश्य पाळेमुळे समाजामध्ये खोलवर रुजलेली असतात, हे या अभ्यासातून स्पष्ट झाले होते. 'त्याच्या'साठी नटतो मुंबईतील १०० पार्लरमध्ये यासंदर्भत सर्वेक्षण करण्यात आले. पार्लरमध्ये जाणाऱ्या विविध वयोगटातील महिलांनी स्वतःसाठी नाही, तर 'तो' खूष राहावा यासाठी नटतो, असे सांगितले. केस कापलेले स्वतःला आवडत नसले तरीही ते कापतो. वजन कमी करण्यासाठी विविध प्रकारच्या गोळ्या घेणे, चेहरा गोरा करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम लावून त्वचाविकारांना निमंत्रण देणाऱ्या मुली व महिलाही यात होत्या. शरीरावर स्वतःचा अधिकार असला तरी गोरेपणाचा, बारीक होण्याचा अट्टहास जोडीदाराला आनंदी ठेवण्यासाठी केल्याचेही या सर्वेक्षणात दिसून आल्याचे संस्थेच्या समुपदेशक संभवी महाडिक यांनी सांगितले. सीआरसी केंद्रांची मदत ज्या ठिकाणी हिंसा होते, त्याचवेळी पीडित महिलेला मदत मिळावी यासाठी मुंबई, नाशिक, अहमदनगर येथे कोरो सामाजिक संस्थेकडून वस्ती समस्या नोंद केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. त्यांना केस नोंदणी केंद्र असे म्हणतात. मुंबईत अशी २४ केंद्रे आहेत. प्रत्येक केंद्रामध्ये एक महिला समन्वयक असून, त्या महिलेला साडेतीनशे घरांची जबाबदारी देण्यात येते. या साडेतीनशे घरामध्ये कोणत्याही स्वरूपामध्ये तक्रारी आल्या, तर त्याचे निवारण करण्याचे काम या महिला उत्तम प्रकारे बजावतात. या सहा वर्षांच्या काळात नगर, नाशिक, मुंबईत मिळून ४,५०० तक्रारी आल्या आहेत आणि त्यातील ३,०३८ तक्रारी या केवळ कौंटुबिक हिंसाचाराशी संबधित आहेत. (क्रमशः)
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3Bax0vT
No comments:
Post a Comment