दुबई : कोलकाता नाइट रायडर्सने आजच्या महत्वाच्या सामन्यात लौकिकाला साजेसा खेळ करत सनराय़झर्स हैदराबादवर विजय मिळवला. केकेआरने प्रथम गोलंदाजी करताना हैदराबादच्या संघाला ११५ धावांवर रोखले होते. हे आव्हान माफक वाटत असले तरी हैदराबादने भेदक गोलंदाजी केल्यामुळे हा सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगला होता. पण अखेरच्या षटकामध्ये अखेर कोलकाताने हैदराबादवर सहा विकेट्स राखून विजय मिळवला. हैदराबादने कोलकातापुढे विजयासाठी ११६ धावांचे आव्हान ठेवले होते. त्यावेळी कोलकाताचा संघ हा सामना सहज जिंकेल, असे वाटत होते. पण हैदराबादच्या गोलंदाजांनी यावेळी चांगली गोलंदाजी केली आणि त्यामुळेच हा सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगला. हैदराबादच्या संघाने पहिल्या सात षटकांमध्ये कोलकाताची २ बाद ३८ अशी अवस्था केली होती. पण कोलकाताचा सलामीवीर शुभमन गिलने यावेळी खेळपट्टीवर ठाण मांडला होता. गिलने हैदाराबादच्या गोलंदाजीचा समर्थपणे सामना करत कोलकाताची धावसंख्या वाढवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. गिलने यावेळी ५१ चेंडूंत १० चौकारांच्या जोरावर ५७ धावांची खेळी साकारली. पण मोक्याच्या क्षणी गिल आऊट झाला आणि कोलकाताचा संघ अडचणीत सापडला होता. यावेळी संघाच्या मदतीला धावून आला तो दिनेश कार्तिक. कारण टदिनेशने यावेळी अखेरपर्यंत खिंड लढवली आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दिनेशने यावेळी १२ चेंडूंत तीन चौकारांच्या जोरावर नाबाद १८ धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. या विजयासह कोलकाताने या स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवले आहे. कोलकाताच्या संघाने यावेळी सुरुवातीला अचूक गोलंदाजीचा नमुना पेश केला. कोलकाताने हैदराबादला पहिल्याच षटकापासून धक्के द्यायला सुरुवात केली आणि त्यानंतरही ठराविक फरकाने त्यांच्या फलंदाजांना बाद केले. हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सनने यावेळी सर्वाधिक २६ धावा केल्या, अन्य फलंदाजांंना मात्र यावेळी चांगली धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे हैदराबादच्या संघाला प्रथम फलंदाजी करताना ११५ धावा करता आल्या. हैदराबादने जर अजून १५-२० धावा जास्त केल्या असत्या तर कदाचित हा सामना त्यांना जिंकता आला असता.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3Dd0ZE9
No comments:
Post a Comment