: भाजपचे माजी खासदार व नेते किरीट सोमय्या यांना मानहानीच्या दोन खटल्यांमध्ये मंगळवारी अतिरिक्त मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने वैयक्तिक हमीवर जामीन मंजूर केला आणि पुरावे नोंदवण्यासाठी पुढील सुनावणी २५ नोव्हेंबरला ठेवली. सोमय्या यांनी 'ट्विटर'वर आमची बदनामी करणारे ट्विट पोस्ट केले आणि त्यामुळे आम्हाला नाहक त्रास सहन करावा लागला, असा दावा करून स्वयंसेवी संस्था 'अर्थ' व सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कलमे यांनी त्यांच्याविरोधात अॅड. अदनान शेख व अॅड. अमानी खान यांच्यामार्फत मानहानीचे फौजदारी खटले दाखल केले आहेत. न्या. पी. आय. मोकाशी यांनी याविषयी प्राथमिक पुराव्यांची तपासणी केल्यानंतर प्रकरणांची दखल घेऊन सोमय्या यांना समन्स बजावले होते. त्याप्रमाणे सोमय्या मंगळवारी न्यायालयात हजर राहिले आणि आपण दोषी नसल्याचा दावा त्यांनी केला. त्यानंतर न्यायालयाने त्यांना दोन्ही प्रकरणांत प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक हमीवर जामीन मंजूर केला. 'कॅबिनेटमंत्री जितेंद्र आव्हाड यांचा उजवा हात असलेले प्रवीण कलमे हे भ्रष्ट व अवैध कारवायांमध्ये गुंतले आहेत, अशा आशयाचे ट्विट सोमय्या यांनी प्रसिद्ध करून माझी नाहक बदनामी केली,' असे कलमे यांनी तक्रारीत म्हटले. तर अर्थ संस्थेनेही सोमय्या यांच्यावर निराधार आरोप केल्याचा व बदनाम केल्याचा दावा तक्रारीत केला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3aaBw1B
No comments:
Post a Comment