Breaking

Wednesday, November 3, 2021

शिक्षकांच्या दातृत्वातून साकारणार ३ कोटी रुपयांचे डायग्नोस्टिक सेंटर https://ift.tt/3bF6bou

: करोनाच्या दुसऱ्या लाटेचं थैमान सुरू असताना राज्यात अनेक रुग्णांना वैद्यकीय सुविधा मिळत नव्हत्या. सर्वसामान्यांना या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी वैद्यकीय इमारत उभारण्यासंदर्भात शिक्षकांमध्ये चर्चा झाली आणि शिक्षकांनी एका दिवसाचा पगार जमा केला. त्यातून तीन कोटी रुपये जमले. या पैशातून डॉ. द्वारकादास कोटणीस आयसोलेशन हॉस्पिटलजवळ डायग्नोस्टिक सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाकाळात सीपीआरसह कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये करोना रुग्णांवर उपचार केले जात होते. ५० खाटांच्या हॉस्पिटलमध्ये आयसीयू कक्षाचीही सोय आहे. तसंच एक ओपीडी सेंटर असून सर्वसामान्य रुग्णांना हे हॉस्पिटल आधार आहे. करोनाच्या काळात त्याठिकाणी ऑक्सिजनची सोयही करण्यात आली आहे. याच हॉस्पिटलच्या परिसरात उपलब्ध जागेवर डायग्नोस्टिक सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांनी एक दिवसाचा पगार दिला असून त्यातून तीन कोटी रुपये जमले आहेत. या रक्कमेतून डायग्नोस्टिक सेंटर उभारण्यात येणार आहे. एका चांगल्या कामांसाठी शिक्षकांच्या सहभागाबद्दल पालकमंत्री सतेज पाटील यांनी कौतुक केलं आहे. दरम्यान, पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत सर्किट हाऊस येथे शिक्षक, शिक्षकांचे नेते यांची बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त कांदबरी बडकवले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चव्हाण उपस्थित होते. या बैठकीत नियोजित तीन मजली राजर्षी शाहू डायग्नोस्टिक सेंटर इमारत आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. सेंटरमध्ये आरोग्यासंबधित सर्व तपासणीसाठी यंत्रणा उभारण्यात येणार असून या तपासण्या माफक दरात होणार आहेत. सेंटरमध्ये यंत्र सामुग्रीसाठी निधी कमी पडल्यास जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले. बैठकीला संघटनेचे राजाराम वरुटे, प्रसाद पाटील, मोहन भोसले, सर्जेराव सुतार, एस.के. पाटील यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3EF2JGQ

No comments:

Post a Comment