म. टा. प्रतिनिधी, नागपूरनागपूर : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महामंडळाला आर्थिक तोटा होत असतानाच बसस्थानक परिसरातील दुकानदार, कॅन्टीनचालकांचे गणितदेखील बिघडले आहे. संपाने अक्षरश: गिऱ्हाइकी संपविल्याची भावना व्यक्त होऊ लागली आहे. एसटी स्थानकावरील कॅन्टीनचा व्यवसाय मुख्यत: तेथील कर्मचाऱ्यांवर अवलंबून असतो. ते संपावर गेल्याने त्याचा मोठा परिणाम कॅन्टीनच्या व्यवसायावर झाला आहे. रिकाम्या खुर्च्या आणि ग्राहकांसाठी वाट पाहणारे कर्मचारी, असे तेथील सध्याचे चित्र आहे. कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याने सांगितले की, 'पूर्वी दररोज १००-१२० प्लेट नाश्ता विकला जायचा. परंतु, संपामुळे दिवसाकाठी दहा प्लेटदेखील विक्री होत नाही. आधी १०-१२ लिटर चहा तयार करावा लागत होता. आता अर्धा लिटरही विकल्या जाण्याची शाश्वती नाही. विक्री वाढावी म्हणून आम्ही खाद्यपदार्थांच्या किमतीही कमी केल्या. परंतु, त्याचा काहीही फायदा झाला नाही. विक्री नसल्याने डोसा, राइस थाली बंद केली आहे. समोसा, सांबर वडादेखील रोज फेकावा लागत आहे. संप संपल्याशिवाय ही परिस्थिती सुधारण्याची शक्यता नाही. बसस्थानकावरील अन्य दुकानांचीदेखील हीच अवस्था आहे.' बेसन-भात, कच्चा चिवडा गणेशपेठ बसस्थानकावर दिवसभर उपाशीपोटी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी स्थानिक कर्मचारी सरसावले आहेत. बेसन-भात, कच्चा चिवडा, चहा-बिस्किट यावर कर्मचाऱ्यांना दिवस काढावा लागत आहे. गणेशपेठ बसस्थानकावर शुकशुकाट बघायला मिळत असला तरी दुसरीकडे संपावर बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेदनांचा आवाज घुमतोय. स्थानिक कर्मचारी सकाळी सातपासून धरणास्थळी येतात तर बाहेर गावातील कर्मचारी रात्रभर तिथेच ठाण मांडून बसतात. दहा-वीस रुपये वर्गणी गोळा करून जेवणाची सोय केली जात आहे. आंदोलनस्थळी तयार होणारे जेवण तेथील पोलिस कर्मचारी, ऑटोचालक आणि स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांनादेखील पुरवले जाते. 'पोटासाठी करतोय आंदोलन' 'दिवसभर आम्ही आंदोलनस्थळी असतो. एकही कर्मचारी उपाशी राहू नये म्हणून थोडीफार वर्गणी गोळा करून जमेल ते अन्न शिजविण्यात येत आहे', अशी भावना एका कर्मचाऱ्याने व्यक्त केली. आंदोलनातील एक महिला कर्मचारी म्हणाल्या की, 'फार वाईट स्थितीत आम्ही दिवस काढतोय. इथे थोडेफार अन्न तयार करून ते मी घरच्यांसाठी नेते. पोटासाठी हे आंदोलन करावे लागत आहे.'
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3rhwB8R
No comments:
Post a Comment