Breaking

Friday, December 17, 2021

झाडूसाठी गवत कापत असतानाच वाघाने झडप घातली अन..... https://ift.tt/30F4be6

गडचिरोली : झाडूसाठी गवत कापण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने झडप घालून ठार केल्याची घटना शुक्रवार 17 डिसेंबरला दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास गडचिरोली तालुक्यातील राजगाटा चक येथील जंगल परिसरात घडली.अनुसया शामराव मोगरकर (५८) असे मृतक महिलेचे नाव आहे. जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलात ही घटना शुक्रवार दुपारी 1.30 वाजताच्या सुमारस ही घटना घडली असून गावापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतशिवारातील जंगलातून वाघाने तिला जवळपास 100 मीटर अंतरावर फरपटत नेले. प्राप्त माहितीनुसार, अनुसया शामराव मोगरकर ही महिला झाडूसाठी गवत कापण्यासाठी इतर तीन महिलांसोबत जंगलात गेली होती. एफडीसीएम खंड क्रं.1 च्या कुंपनाजवळ जंगलात दबा धरुन बसलेल्या नरभक्षक वाघाने त्या महिलेवर हल्ला चढविला. याची चाहूल सोबतच्या महिलांना लागताच त्यांनी आरडाओरड केला. याचवेळी लगतचे गुराखीही धावून आले. परंतु वाघाच्या तावडीतून तिला सोडविण्याची कुणाचीच हिंमत झाली नाही. लगेच त्यांनी घटनेची माहिती गावात भ्रमणध्वनीवरून दिली. काही वेळातच गावातील नागरिक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर गावकऱ्यांनी अनुसयाचा शोध घेतला असता, एका झुडपात वाघ अनुसया जवळ होता. लोकांनी आरडाओरड करून वाघाला पळवून लावले. परंतु तोपर्यंत अनुसया गतप्राण झाली होती. या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. वनविभागाने पंचनामा करून अनुसया शामराव मोंगरकर यांचा मृतदेह शविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठविला आहे. गडचिरोली जिल्ह्यात मागील दोन वर्षापासून मानव आणि वन्यजीव संघर्ष सुरु आहे. वनविभागाने गडचिरोली जिल्ह्यातील नरभक्षक वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी या परिसरातील नागरिकांनी वनसंरक्षक कार्यालय गडचिरोली समोर उपोषण केले होते. मात्र वन विभागाला यात यश आले नाही. राजगाटा चक येथील ही तिसरी घटना असून पहिली घटना 6 नोव्हेंबर 2020 रोजी घडली होती यात गोविंदा गावतुरे ठार झाले होते. त्यानंतर दुसरी घटना या वर्षीच्या उन्हाळ्यात घडली यात एक इसम जखमी झाला होता. तर आता शुक्रवारी अनुसया मोगरकर ही महिला वाघाच्या हल्ल्यात ठार झाली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/30AauPV

No comments:

Post a Comment