Breaking

Friday, December 3, 2021

औरंगाबादकरांनो, ऐकलंत का! करोनाचं टेन्शन सोडा, जिल्ह्यातून आली दिलासादायक बातमी https://ift.tt/3dlrnk6

औरंगाबाद : तब्बल २० महिन्यांनंतर औरंगाबादकरांसाठी करोनाबाबत अतिशय चांगली बातमी आहे. औरंगाबाद शहरात २३ मार्च २०२० रोजी पहिला करोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. दुसऱ्या लाटेत शहराचा आकडा हजाराच्या जवळ पोचला होता. काही दिवसांपासून युद्धपातळीवर सुरू असलेले लसीकरण, औरंगाबादकर घेत असलेली काळजी यामुळे शुक्रवारी शहरात एकही करोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. मार्च २०२० मध्ये भारतात करोनाचे रुग्ण आढळून येणे सुरू झाले. २३ मार्च रोजी औरंगाबादेत पहिला रुग्ण आढळला. तेव्हापासून प्रशासन, महापालिका प्रशासन, आरोग्य विभाग, पोलिस यंत्रणेसह, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, सेवाभावी संस्था, संघटनांनी पुढाकार घेऊन औरंगाबाद शहराचा करोनापासून बचाव करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. पहिली लाट ओसरल्यानंतर डिसेंबर २०२० मध्ये दुसऱ्या लाटेने शिरकाव केला. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च २०२१ मध्ये करोनाबाधितांच्या आकड्यात मोठी वाढ झाली होती. मात्र, प्रशासनाच्या पुढाकाराने आणि शहरवासियांनी केलेल्या सहकार्यामुळे दुसऱ्या लाटेचाही यशस्वीपणे मुकाबला करण्यात यश मिळाले. करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेसाठी प्रशासनाने पुढाकार घेतला. मध्यंतरीचा काही कालावधी वगळता शहरात लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला. नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून युद्धपातळीवर लसीकरण मोहिम राबविणे सुरू झाले, त्याला औरंगाबादकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद मिळत असल्याने औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस कमी होत गेला. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत नव्याने सापडलेल्या ओमायक्रॉन विषाणूमुळे जगाची चिंता वाढवली आहे. गुरुवारी भारतात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आल्याने चिंतेत भर पडली. मात्र शुक्रवारी करोना रुग्णांच्या अहवालानंतर अत्यंत दिलासाजनक बातमी समोर आली. शुक्रवारी औरंगाबाद शहरात १४२३ अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या, गुरुवारी ४७९ आरटीपीसीआर चाचण्या गेल्या होत्या, त्यापैकी एकही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. त्यामुळे औरंगाबाद शहरवासियांनी तब्बल २० महिन्यानंतर दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागात शुक्रवारी तीन करोनाबाधितांची भर पडली. उस्मानाबादलाही दिलासा उस्मानाबाद जिल्ह्यात शुक्रवारी ९५६ जणांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या, त्यापैकी एकही जण करोनाबाधित आढळून आला नाही. गेल्या आठवडाभरापासून उस्मानाबाद जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा पाचच्या आत असल्याचे नोंदविले गेले. लस घ्या, त्रिसूत्री पाळा औरंगाबाद शहरात शुक्रवारी एकही करोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. मात्र शहरवासियांनी गाफिल न राहता लसीकरण करुन घ्यावे. घराबाहेर पडताना मास्क लावावा, सॅनिटायझर आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/31r6JNg

No comments:

Post a Comment