: जळगाव जिल्हा बँकेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस या पक्षांची सत्ता आली आहे. जिल्हा बँकेच्या चेअरमन () आणि व्हाईस चेअरमनपदासाठी ३ डिसेंबर रोजी निवड प्रक्रिया होणार आहे. मात्र, त्याआधी चेअरमनपदाचे नाव निश्चित करण्यासाठी गुरुवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत मविआच्या नेत्यांची बैठक होत आहे. जिल्हा बँकेत २१ पैकी २० संचालक महाविकास आघाडीचे आहेत. तीनही पक्षांची काही नावांवर चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय पालकमंत्री गुलाबराव पाटील हेच घेणार आहेत. या बैठकीत माजी मंत्री एकनाथ खडसे, गुलाबराव देवकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील, आमदार चिमणराव पाटील, किशोर पाटील, संजय पवार यांच्यासह इतर संचालक उपस्थित राहणार आहेत. गुरुवारी होणाऱ्या या बैठकीत तीनही पक्षांमध्ये चेअरमनपदाचा काळ कशा पद्धतीने वाटून घेतला जाणार, हे देखील स्पष्ट होणार आहे. पहिल्या वर्षी राष्ट्रवादीला संधी मिळते की शिवसेनेला याचा निर्णयही होणार आहे. दरम्यान, चेअरमनपदासाठी राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांचे नाव आघाडीवर आहे. तसंच त्यांच्या नावासाठी सर्वांकडून सहमती देखील मिळाली आहे. मात्र, पहिली संधी कोणाला यावर ते अवलंबून आहे. पहिली संधी शिवसेनेला मिळाल्यास आमदार किशोर पाटील यांचे नाव देखील पुढे येण्याची शक्यता आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3obLPKA
No comments:
Post a Comment